नांदेड : गोरठेकर पिता-पुत्र आणि डॉ.माधव किन्हाळकर यांचा २५ वर्षांचा कार्यकाळ वगळता ५० वर्षे भोकर तालुका आणि या मतदारसंघाचा ‘सात-बारा’ चव्हाण कुटुंबीयांच्या नावावर राहिला. त्यानंतर आता या परिवाराचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यावर ‘मी भोकरचा-भोकर माझे’ असे जाहीरपणे सांगण्याची वेळ आली असून या घोषणेतून त्यांचे एक पाऊल मागे पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे !

आधी लंडनवारी आणि रविवारी काही तास मुखेडच्या पूरग्रस्त भागाची फेरी करून सायंकाळी भोकर येथे दहीहंडी कार्यक्रमानिमित्त जमविलेल्या जनसमुदायासमोर बोलताना अशोक चव्हाण यांनी केलेले वरील वक्तव्य त्यांच्या स्थानिक ‘गृहपत्रा’ने प्रकाशित केल्यानंतर त्यावर भोकर मतदारसंघात चर्चा होत आहे.शरद पवार म्हटले की, संपूर्ण बारामती मतदारसंघ, विलासरावांचे नाव आले की, लातूर जिल्हा किंवा मुंडे म्हणताच परळी-बीड या समीकरणांच्या धर्तीवर नांदेडचा जिकर झाला की, आधीच्या काळात शंकरराव आणि त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण हे नाव राज्यभर घेतले गेले. हा जिल्हा लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ९ मतदारसंघांमध्ये विभागला असून काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांची ओळख आणि त्यांचे स्थान जिल्ह्याची सीमा ओलांडून राज्यस्तरीय झाले होते. भाजपात गेल्यावर या पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतले; पण आता त्यांनीच स्वतःला भोकरपुरते मर्यादित करून घेतल्याचे समोर आले.

शंकरराव चव्हाणांनंतर अशोक चव्हाण, मध्ये त्यांच्या पत्नी अमिता यांनी भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता त्यांची कन्या श्रीजया भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या सर्वांचा एकूण कार्यकाळ ५० वर्षांचा. एक खेडं ते आता नगर परिषद असलेले शहर हे भोकरचे स्थित्यंतर या कुटुंबाने अनुभवले, तरी या शहरात ना शंकररावांनी कधी वास्तव्य केले, ना त्यांच्या पुढच्या पिढीने. नांदेडहून ‘अप-डाऊन’ करतच त्यांनी भोकरची सूत्रे आपल्या हाती राखली. खुद्द शंकररावांना ‘मी भोकरचा’ हे कधी सांगावे लागले नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत चव्हाणांची कन्या या मतदारसंघात भाजपातर्फे उभी राहणार, हे स्पष्ट झाल्यानंतर या भागात ‘भूमिपुत्रच आमदार हवा’ अशी वातावरण निर्मिती काँग्रेसच्या संदीपकुमार देशमुख यांनी केली. त्यांचा हा मुद्दा समाजमाध्यमांतून सर्वत्र पसरल्यामुळे भाजपा आणि चव्हाण परिवाराची मोठी कोंडी झाली होती; पण त्यांचे सुदैव असे की, काँग्रेसचा उमेदवार प्रभावशाली नव्हता आणि त्याने एकांगीपणे तसेच नियोजनाशून्य निवडणूक प्रचार केल्यामुळे शंकररावांची काँग्रेसी परंपरा जपत आलेल्या या मतदारसंघात भाजपाचे कमळ प्रथमच फुलले.

या पार्श्वभूमीवर ‘आ.श्रीजया यांनी मी देखील भूमिपुत्र आहे, माझे नाव भोकर मतदारसंघाच्या यादीत समाविष्ट असून मी भोकरची आहे’, हे म्हणणे रास्त मानले जाईल; पण चव्हाणांसारख्या राज्यस्तरीय नेत्याला आपली ओळख एका विधानसभा मतदारसंघातल्या एका शहराचे नाव घेऊन द्यावी लागल्यामुळे भाजपात त्यांचे पाऊल पुढे पडण्याऐवजी मागे पडत असल्याचे दिसत आहे. राज्यसभेतील त्यांचेच सोबती खा.अजित गोपछडे हे आपली प्रतिमा विस्तारत असून भाजपाने त्यांना छोट्याशा अन् संवेदनशील अशा एका राज्याचे प्रभारी केले, तर इकडे चव्हाण स्वतःला केवळ एका मतदारसंघातच गुंतवून घेत असल्याचे सतत दिसून येत आहे.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या स्थापनेनंतर आपली सीमारेषा स्पष्ट करण्यासाठी तेव्हा केलेली, ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ ही घोषणा लक्षवेधी ठरली होती. त्याच धर्तीवर खा.चव्हाण यांचे जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या मतदारसंघाचे नाव न घेता, ‘मी जनतेचा, जनता माझी’ ही घोषणा आपल्या कार्यक्षेत्रात चांगलीच बिंबवली. पण चव्हाणांसारखा वलयांकित नेता ठाकरे-चिखलीकर यांच्याही मागे आला असून त्यांनी स्वतःला ‘भोकरपुरते’ मर्यादित करून टाकले आहे.

आगामी काळात नांदेड मनपावर भाजपाचा झेंडा फडकविणे हे खा.अशोक चव्हाण यांचे राजकीय ध्येय आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा प्रत्येक शब्द नांदेडकरांनी उचलून धरत या पक्षाला मनपामध्ये २५ वर्षांहून अधिक काळ सत्ता दिली. आता ते स्वतःच ‘मी भोकरचा’ म्हणत असतील तर नांदेडकरांनी त्यांना तिकडेच दत्तक देऊन टाकावे.संदीपकुमार देशमुख,काँग्रेस कार्यकर्ते, बारड