जालना : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी जालना शहराजवळील नागेवाडी परिसरात झाला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणास बसलेले दीपक बोऱ्हाडे यांना भेटण्यासाठी सदावर्ते जालना शहरात आले होते.

सदावर्ते यांच्या वाहनावर दोन-तीन जण धावून गेले. तेव्हा तेथे ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा सुरू होत्या. पोलिसांनी त्यांना वेळीच आवरून ताब्यात घेतले. त्यानंतर सदावर्ते यांनी उपोषणकर्ते बोऱ्हाडे यांची भेट घेतली. बोऱ्हाडे यांच्या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता. रविवारी धनगर समाज बांधवांची मोठी संख्या उपोषणस्थळी होती. येत्या बुधवारी (दि. २४) जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी ते म्हणाले, अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याची धनगर समाजाची मागणी संवैधानिक आहे- आम्हाला राज्यात सत्ता दिली तर धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीमध्ये दिले होते. ही मागणी त्यांनी आता पूर्ण करावी. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी धनगर समाजाची आरक्षणाची मागणी कायदेशीर असल्याचे सांगितले.

जरांगेंकडून दोन समाजात तेढ

येथे घेतलेल्या वार्ताहर बैठकीत बोलताना सदावर्ते म्हणाले, दीपक बोऱ्हाडे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली पाहिजे. मनोज जरांगे जेव्हा छगन भुजबळ यांच्या संदर्भात वक्तव्ये करतात तेव्हा शरद पवार का बोलत नाहीत ? असा सवाल करून जरांगे दोन समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला.

जरागेंच्या बैठकीत मधमाश्यांचा हल्ला

अंतरवाली येथे रविवारी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना अचानक मधमाश्यांचा हल्ला झाला. त्यामध्ये मधमाश्यांनी काही जणांना चावा घेतल्याने धावपळ झाली.