हिंगोली येथे दुसरा ‘ओबीसी एल्गार मेळावा’ पार पडला. यावेळी ओबीसी नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांना लक्ष्य केलं. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही मनोज जरांगे-पाटलांवर टीका केली आहे. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? असा सवाल बबनराव तायवाडेंनी उपस्थित जरांगे-पाटलांना विचारला आहे.
बबनराव तायवाडे म्हणाले, “सत्तर वर्षे आमचं ओबीसींनी चोरलं, असं सतत बोललं जात आहे. पण, काय चोरलं आहे? आतापर्यंत सहा-सात अहवाल समोर आले. पण एकाही अहवालात मराठे मागास असल्याचं सिद्ध झाले नाहीत. मग, ओबीसींनी काय चोरलं? हे सिद्ध करायला हवं.”
हेही वाचा : “तुम्ही कुणाची लायकी काढता?” जरांगे-पाटलांवर छगन भुजबळ संतापले; म्हणाले, “शिवरायांच्या स्वराज्यासाठी…”
“…म्हणून कुणी तशी हिंमत करू नये”
“तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करता. आमच्या नेत्याला ( छगन भुजबळ ) शिवीगाळ करता. पण, त्यांना शिवीगाळ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आमच्या नेत्याकडे बघणाऱ्याचा डोळा काढण्याची ताकद ओबीसींमध्ये आहे. त्यामुळे कुणी तशी हिंमत करू नये,” अशा शब्दांत तायवाडेंनी ठणकावलं आहे.
“लायकी काढण्याची हिंमत कराल, तर…”
“आमची लायकी काढत आहेत. यांना आमची लायकी काढण्याचा अधिकार कुणी दिला? ओबीसी, एससी, एसटी या तीन जातींचा जरांगे-पाटील अपमान करत आहे. आमची लायकी नाही, तर आमच्या पंक्तीत कशासाठी येत आहात? लायकी काढण्याची हिंमत कराल, तर महाराष्ट्रात फिरणे बंद करू,” असा इशारा तायवाडेंनी जरांगे-पाटलांना दिला आहे.
हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांचा ओबीसी नेत्यांना इशारा, छगन भुजबळ म्हणाले, “मी त्यांना सांगू इच्छितो की…”
“आमचा अपमान कदापीही सहन करणार नाही”
“आतापर्यंत आम्ही गप्प होतो. शांत पद्धतीनं जगणारे आम्ही लोक आहोत. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. ४०० जातींचे ६० टक्के लोक महाराष्ट्रात आहेत. आमचा अपमान कदापिही सहन करणार नाही,” असेही तायवाडेंनी म्हटलं आहे.