Ramdas Kadam : दसरा आणि शिवसेना यांचं नातं मागच्या अनेक वर्षांपासून आहे. शिवसेनेत २०२२ ला जी फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेंचा असे दोन मेळावे दसऱ्याच्या निमित्ताने पार पडतात. एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांच्या मृतदेह हातांचे ठसे घेण्यासाठी तसाच ठेवला होता. या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी चौकशी केली पाहिजे अशी मागणी रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात दिली. दसरा मेळाव्यात ही माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. ही माहिती तुम्हाला कुणी दिली? याबाबत विचारलं असता रामदास कदम यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

रामदास कदम यांनी नेमकं काय म्हटलं होतं दसरा मेळाव्यात?

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळच्या काही घडामोडींचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. ते त्यांच्या भाषणात म्हणाले “माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता? अंतर्गत काय चाललं होतं? मी ८ दिवस तिथे खाली मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो. सगळं कळत होतं. हे सगळं कशासाठी?” असं रामदास कदम म्हणाले. दसरा मेळावा संपल्यानंतर पत्रकारांनी रामदास कदम यांच्याशी संवाद साधला.

पत्रकारांच्या प्रश्नाबाबत काय म्हणाले रामदास कदम?

मी आज मेळाव्यात जे बोललो ती माहिती मला बाळासाहेब ठाकरेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर ठेवला होता हे मला त्या डॉक्टरांनी सांगितलं. याचं कारण काय होतं हे विचारलं असता रामदास कदम म्हणाले की हे तुम्ही उद्धव ठाकरेंनाच विचारा. याबाबत मी कसं काय सांगणार? मातोश्रीवर ही चर्चा सुरु होती बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. मात्र ते कशासाठी घेण्यात आले ते काही समजलं नाही. आज मला बोलावंसं वाटलं म्हणून बोललो. हळूहळू गोष्टी मी बाहेर काढणार आहे. ये तो झाँकी है अभी बहुत कुछ बाकी है. कारण उद्धव ठाकरे आमच्या मुळावर उठत असतील, माझ्या मुलाला अकारण टार्गेट करत आहेत असं असेल तर तुमचं लोकांसमोर आणायला अडचण काय? एखाद्या डॉक्टरांनी जर मला सांगितलं असेल तर मला ते बोललं पाहिजे. शिवाय मी आत्ता बोललो आहे ते काहीच नाही अजून बऱ्याच गोष्टी आहेत. कितीवेळा तुम्ही (उद्धव ठाकरे) बॅगा घेऊन मातोश्रीवरुन निघाला होतात हे सगळं मला माहीत आहे. सूड भावनेने मी नाही वागत सूड भावनेने ते वागत आहेत असंही रामदास कदम यांनी सांगितलं.