लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग: मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती देता यावी यासाठी आजपासून (२७ ऑगस्ट) गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुक पोलीसांकडून याबाबतची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. जिवनावश्यक वस्तूंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना यातून सुट देण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. या कामाला गती देता यावी यासाठी हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला. रस्त्याचे काम सुरु असल्याने सध्या एका मार्गिकेतून वाहतुक सुरु आहे. या ठिकाणी अवजड वाहनामुळे सातत्याने वाहतुक कोंडी निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक नियंत्रित करण्यात यावी अशी मागणी महामार्ग प्राधिकरणाने केली होती. त्यानुसार या बाबतची अधिसुचना जारी करण्यात आली. त्याच बरोबर गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी असते, त्यांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावा या दृष्टीनेही हा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा-मुंबई गोवा पदयात्रेसाठी मनसैनिक पळस्पे येथे एकवटले

१६ टनापेक्षा जास्त क्षमता असलेल्या ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर यांना ही बंदी लागू असणार आहे. २७ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी मुंबई गोवा महामार्गावर हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत अवजड वाहतुक ही पर्यायी मार्गांनी वळवली जाणार आहे. पोलीस उप आयुक्त वाहतुक तिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पर्यायी मार्ग कोणता….

पळस्पे फाटा येथून कोन फाटा येथून मुंबई पुणे दृतगती महामार्गाचा वापर करून, खालापूर येथून पाली वाकण मार्गे अवजड वाहतूक वळविण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on heavy vehicles on mumbai goa highway mrj