बीड : व्याजाने घेतलेल्या पैसे परत करण्यासाठी दोघांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून परळीतील एक शेतमजूर व अल्प भूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. अंबाजोगाई येथील अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालय मध्ये उपचार चालू असताना ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. देविदास एकनाथ शिंदे (वय ५५ वर्ष रा. कृष्णा नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वडिलांच्या आत्महत्येस दोघे जण जबाबदार असल्याची तक्रार देविदास शिंदे यांच्या मुलाने दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

देविदास शिंदे यांनी दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याचे व्याजासह पाच लाख रुपये होतात. ते परत कर नाहीतर तुझी जमीन आमच्या नावावर कर असे म्हणून भारत विक्रम गायकवाड व अशोक विक्रम गायकवाड या परळी येथील दोघांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. घरी जाऊन शिंदे यांना मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून देविदास शिंदे यांनी परळी जवळील शेतात विषारी औषध प्राशन केले.

त्यानंतर त्यांच्यावर अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परळी येथील संभाजीनगर पोलिसांनी भारत विक्रम गायकवाड व अशोक विक्रम गायकवाड या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघा पैकी एकास अटक करण्यात आली आहे.