सोलापूर : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा किंचितही परिणाम महायुतीवर होणार नाही, असा दावा केला आहे.

सोलापुरात गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. दोघे ठाकरे बंधू आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकतात. परंतु त्यांच्या एकत्र येण्याचा कोणताही परिणाम शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासह महायुतीवर होणार नाही. उध्दव ठाकरे यांच्याबाबत राज ठाकरे यांच्या मनात आता कसा काय पान्हा फुटला माहीत नाही. पण दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यातून त्यांना कोणताही फायदा होणार नाही, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोघे ठाकरे बंधू एकत्र येत असतील काय, या प्रश्नावर भाष्य करताना गोगावले यांनी मुंबईत आतापर्यंत ८० पेक्षा जास्त माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले आहेत. मुंबईत ठाकरे यांची नव्हे, तर एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीची मजबूत सत्ता आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंना एकमेकांबद्दल कितीही उमाळा आला तरी त्यांना त्याचा राजकीय लाभ होण्याचे दिवस आता राहिले नाहीत, असाही दावा गोगावले यांनी केला.