लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाकडून पुन्हा एकदा धक्का बसला आहे. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी आज (१७ मार्च) रोजी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. विधान परिषदेसाठी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडोमोडीनंतर सर्वांच्या चर्चेचे विषय राहिलेले आणि स्वत: उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेले आमदार पाडवी यांनी शिंदे गटाला जवळ केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे. 

ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आमश्या पाडवी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि १० महिला सरपंच, ४८ पुरुष सरपंच, २ जिल्हा परिषद सभापती, २ उपजिल्हाप्रमुख, ४ पंचायत समिती सदस्य, एक युवासेना जिल्हाधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादाजी भुसे, खासदार भावना गवळी, आमदार संजय शिरसाट, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेश झाल्यानंतर आमश्या पाडवी यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ते म्हणाले, मी राहतो तो अतिदुर्गम आणि आदिवासी भाग आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७६ वर्षे झाली, पण आदिवासी विभागाचा काहीच विकास झाला नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम चांगलं काम करतंय. आम्हीही शिवेसनेचे आहोत. त्यामुळे कुठेतरी आपल्या भागाचं चांगलं काम करून घ्यायचं.

हेही वाचा >> ‘सुप्रिया सुळेंमुळे राष्ट्रवादी आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेत फूट’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

ते पुढे म्हणाले, रस्त्याचा, धरण्याचा विषय आहे. तसंच, मी काँग्रेसच्याविरोधात दोनवेळा उभा होतो. दोन्हीवेळा पडलो. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही आता काँग्रेसच्या माणसाला मदत करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कोण आहेत आमश्या पाडवी?

विधान परिषदेत आदिवासींच्या प्रश्नावर धारदारपणे वक्तव्य करणारे पाडवी यांची अनेक वेळा ठाकरे यांनी आमचा ठाण्या वाघ म्हणून प्रशंसा केली आहे. नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर पाडवी यांनी ठाकरे गटाला ताकद देण्याचे काम केले. पाडवी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना चांगली टक्कर दिली होती. अवघ्या १२०० मतांनी ते पराभूत झाले होते. त्यामुळे पाडवी यांना ताकद देण्यासाठी शिवसेनेने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांसारख्या आमदारांच्या निवृत्तीनंतर पाडवींना मिळालेली संधी हे शिवसेनेचे मोठे धक्कातंत्र मानले गेले.