मोहनीराज लहाडे
नगर : भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याने भाजपामध्ये आणि जिल्ह्यातही खळबळ निर्माण केली आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्र पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. खासदार विखे यांच्या वक्तव्यातून ते जिल्ह्यात, विशेषत: आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात, आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट तर होतेच त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे मानले जाते. दोघांचीही वक्तव्ये ही राजकीयदृष्टय़ा मोठी असल्याने त्याला आतून पक्षश्रेष्ठींची संमती तर नाही ना अशीही खासगीत चर्चा सुरू आहे. ‘शिवसैनिकांशी आपले वैर नाही, आपल्या खासदारकीमध्ये त्यांचा ५० टक्के वाटा आहे. त्यामुळे शिवसैनिकांना आपण विसरणार नाही. त्यांची साथ आपण सोडणार नाही,’ अशी भूमिका भाजपा खासदार विखे यांनी जाहीर केली आहे. त्याच वेळी त्यांचे वडील माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी ‘अजित पवार यांनी परत यावे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आणावे’ अशी साद घातली आहे. विखे पिता-पुत्रांनी एकाच दिवशी दोन स्वतंत्र ठिकाणी केलेल्या या वक्तव्यांबद्दल जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे.
राज्यात शिवसेना व भाजपा यांच्यातील राजकीय वैमनस्य टोकाला पोहोचलेले असताना भाजपाच्या खासदाराकडून एकीकडे जिल्ह्यातील शिवसेनेसोबत अशी जवळीक निर्माण करणे आणि दुसरीकडे वडिलांनी अजित पवारांना पुन्हा अशी भावनिक साद घालणे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. गेल्या काही दिवसांपासून खा. विखे जिल्ह्यात वेगवेगळय़ा भागांत जाताना भाजपापेक्षा वेगळी, आपल्या सोयीनुसार भूमिका घेऊ लागले आहेत. स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार ती असली, तरी भाजपाच्या भूमिकेशी सुसंगत आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगर शहरात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी विलक्षण सलगी ठेवली आहे. शिवाय नगर शहरातील काँग्रेसचे नगरसेवक पक्षापेक्षा विखे यांच्या संपर्कात अधिक असतात किंवा विखे यांचा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांपेक्षा काँग्रेस नगरसेवकांशी अधिक संपर्क असतो.
नीलेश लंके यांच्यावर टीका
पवार कुटुंबीयांशी असलेल्या परंपरागत राजकीय वैमनस्याला खा. विखे यांनी आमदार रोहित पवार यांच्यापुरता तूर्त लगाम घातला आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मर्जीतले समजले जाणारे आमदार नीलेश लंके यांच्यावर जोरदार आरोप सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही, त्या दृष्टीने आमदार लंके यांच्याकडे पाहिले जाते. त्यासाठी शरद पवार यांच्याकडून आ. लंके यांना बळही दिले जाते आहे. आ. लंके यांच्या मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांशी मात्र विखेंचे वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यातूनच त्यांनी शिवसैनिकांना जवळ करण्याची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. खा. विखे यांचे आजोबा, दिग्गज नेते स्व. बाळासाहेब विखे यांनीही काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर आपला स्वतंत्र गट कार्यरत ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग राबवला होता. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत खासदारांनी अशाच प्रयोगासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यातूनच ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळय़ा भागात वेगवेगळी राजकीय भूमिका मांडत जिल्हा विकास आघाडीची समीकरणे जुळवू लागले आहेत. त्यांच्या या ‘प्रयोगा’ला अद्याप भाजपाच्या वरिष्ठांची संमती मिळाली की नाही हे स्पष्ट झाले नाही. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मात्र विरोध स्पष्ट झालेला आहे.
राज्यसभा निवडणूक निकालाने महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये कोलाहल माजलेला असतानाच माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना ‘अजित पवार यांनी पुन्हा आमच्या समवेत यावे आणि राज्यात फडणवीसांचे सरकार आणावे,’ अशी साद घातली. खरे तर अजित पवार आणि विखे यांच्यात राजकीय सख्य कधीच नव्हते आणि सध्याही नाही. उलट विखे यांच्या वर्चस्वाखालील मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था बरखास्त करण्याच्या मुद्दय़ावरून तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते; परंतु तरीही विखे यांनी अजित पवार यांना साद घातली. त्यांच्या या आवाहनामुळे भाजपासहित राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. विखे पितापुत्रांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यांवर भाजपासहित इतर कोणत्याही पक्षांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
