चिपळूण – भाजप दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांची भेट घेवून त्यांच्याकडे राजीनामा दिला मात्र प्रदेशाध्यक्ष त्यांचा राजीनामा मंजूर करतात का याची सर्वांना उत्सुक्ता लागली आहे.

रत्नागिरी शहराचे नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे. भाजपमधून ठाकरे गटात गेलेले बाळ माने नगराध्यक्षपदासाठी त्यांची सून शिवानी माने हिला उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवानी माने हि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी आहे. शिवानी माने हिला महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली तर राजेश सावंत यांना आपल्याच मुलगीच्या विरोधात म्हणजे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल. त्यामुळे कौटूंबिक आणि राजकीय संघर्ष टाळण्यासाठी सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. येथील प्राथमीक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात भाजपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी चहापान घेतला त्यावेळी सावंत यांनी राजीनामा दिला. सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. ते पक्षात नाराज आहेत. काहींबरोबर त्यांचे वाद झाल्याची अफवा उठली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष भेट घेवून आपली अडचणही त्यांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितली. त्यावर प्रदेशाध्यक्ष काहीही बोलले नाही मात्र सावंत यांनी पाठीवर हात मारून ते सावंत यांना कार्यक्रमाला सोबत घेवून गेले.

माझी मुलगी शिवानी माने ठाकरे गटाकडून रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी उमदवार असणार आहे. अशावेळी मी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावर असे योग्य वाटत नाही. माझी ही अडचण पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावर घालून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी पक्षात नाराज नाही. यापुढे पक्षासाठी काम करत राहणार आहे. – राजेश सावंत, जिल्हाध्यक्ष भाजप