सांगली : कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठीच माझे प्रयत्न राहतील, असे मत भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी व्यक्त केले.

सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यशाळा संपन्न झाली. प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आ.गोपीचंद पडळकर, आ.सत्यजित देशमुख, भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य नीताताई केळकर, माजी आ.पृथ्वीराज देशमुख, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आ.भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, सरचिटणीस विलास काळेबाग, मिलिंद कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले, पक्षाने सम्राट महाडीक यांची अध्यक्षपदी निवड पूर्ण विचार करून केली आहे. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हाभर ते पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील राहतील यात शंका नाही. महायुतीमधील इतर पक्षाचा सन्मान ठेवून भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील.यावेळी पावसकर, आ. पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंख, संग्राम देशमुख, निताताई केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.