कोल्हापूर: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची दोन्ही प्रमुख पदे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोपवण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत रघुनाथ पाटील (बाचणी) यांची तर उपसभापतीपदी राजाराम तुकाराम चव्हाण (येळवण जुगाई) यांची निवड झाली.
शहर उपनिबंधक प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक होवून ही निवड करण्यात आली. पाटील हे मंत्री मुश्रीफ यांचे तर चव्हाण हे जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थक आहे.
या निवडीसाठी नेते मंडळीची काल मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, गायकवाड, बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होवून त्यामध्ये एकमत झाले होते.