कराड : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा ग्रामीण भागातील सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचा संकल्प आहे. तर, दुर्गम भागातील शिक्षण संस्थांना मदत हे महायुती शासनाचे उद्दिष्ट असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात परदेशी विद्यापीठे येणार असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले अध्यक्षस्थानी होते. तर, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, शिवाजी विद्यापीठाचे अमित कुलकर्णी, अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, हिंदूराव पाटील, प्राचार्य शिरीष पवार, नगराध्यक्ष अनिता देवकांत आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, वेगवान जगात ‘पैसा हीच संपत्ती’ ही संकल्पना मागे पडली असून, ज्ञानाच्या संपत्तीला महत्त्व आले आहे. जग बघण्याची, जगाचे ज्ञान ग्रहण करण्यासाठीची जिद्द विद्यार्थ्यांत आहे. सध्या समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिला प्रभावी ठरत असून, त्यांना चालना देण्यासह सुरक्षित व्यवस्थेत शिक्षण मिळावे म्हणून मुलींच्या वसतिगृहांची संख्या वाढविली जाणार आहे. मुली सुरक्षित शिक्षण घेतील, यासाठी नियोजन केले आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेला बळ देऊन, राज्यातील पाच लाख विद्यार्थिनींना सक्षम करण्यासाठी दरमहा दोन हजार रुपये वरखर्चाला (पॉकेटमनी) मिळणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा ग्रामीण भागातील सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचा संकल्प आहे. तर, दुर्गम भागातील शिक्षण संस्थांना मदत हे महायुती शासनाचे उद्दिष्ट असल्याची ग्वाही देखील पाटील यांनी या वेळी दिली.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, चंद्रकांत पाटील शब्दाला जागणारे आहेत. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आहे. तो शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा आहे. खासगी विद्यापीठे निर्माण झाली पाहिजेत. महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असून, शिक्षकांना प्रोत्साहन देताना, फडणवीस सरकार कमी पडणार नसल्याचा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.
सत्यजितसिंहांनी सल्ला देणाऱ्यांपासून व कौतुक करणाऱ्यांपासून सावध राहावे. आपण सरकारमध्ये असल्याची सवय लावून घ्यावी, राजकीय चलाखी करायला शिकावे, असा सल्ला आमदार डॉ. भोसले यांनी यावेळी दिला. कार्यक्रमात सत्यजितसिंह पाटणकर, प्राचार्य शिरीष पवार यांनी मनोगत व्यक्त केले.