भाजपचे १५ सदस्य नाराज असतानाही काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष

चंद्रपूर : कॅबिनेट मंत्री, खासदार आणि दोन आमदार असतानाही महापौर पदाच्या निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडेही काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याने भाजपचे १५ जि.प. सदस्य नाराज असतानाही चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे या जिल्हय़ातील नेते लक्ष देत नसल्यामुळे नगरसेवकांप्रमाणेच जि.प. सदस्यही नाराज झाले आहेत.

चंद्रपूर जि.प. चे पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी राखीव झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले होते. भाजपच्या गटातील १५ नाराज सदस्यांना काँग्रेसकडून हेरण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, काँग्रेसचे प्रयत्न अयशस्वी झाल्याची चर्चा आता राजकीय गोटात आहे. ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे ३३ व अपक्ष ३ अशा ३६ सदस्यांचा गट असून काँग्रेसकडे २० सदस्य आहेत. मात्र भाजपातील १५ सदस्य नाराज असल्याची चर्चा महिनाभरापूर्वी सुरू झाली होती. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपातील असंतुष्टांना सत्तेसाठी ओढण्याचा प्रयत्न केला जात होता. या प्रयत्नाला काही प्रमाणात यश सुद्धा आले होते. जि.प. काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर व माजी सदस्य विनोद अहीरकर यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेत नवी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र याची कुणकुण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना लागताच सावधगिरी म्हणून भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना राज्याबाहेर पर्यटनासाठी रवाना केले.

दरम्यान, भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या स्वरूपात लोकप्रतिनिधी आहेत. मात्र या लोकप्रतिनिधींनी महापौर निवडणुकीप्रमाणेच जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडेही दुर्लक्ष केले आहे. काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले असते तर भाजपचे नाराज १५ जिल्हा परिषद सदस्य गळाला लागले असते, असे काँग्रेसच्या जि.प. सदस्यांचे म्हणणे आहे. शनिवारी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

त्यावेळी हे पर्यटनवारीला गेलेले भाजपचे सदस्य चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजपकडून अध्यक्ष पदासाठी नितू चौधरी व माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरुनुले यांचे नाव आघाडीवर आहे. शेवटच्या क्षणी कोणाचे नावावर अंतिम निर्णय होतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

गडचिरोलीत आज निवडणूक

गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी उद्या, शुक्रवारी निवडणूक होत आहे. येथे भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस- आविस यांची सत्ता आहे. ५१ सदस्य संख्येत २० भाजपाचे, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, राष्ट्रीय समाज पक्ष २ व ग्रामसभाचे २ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचा अध्यक्ष व दोन सभापती, आविसचा उपाध्यक्ष व एक सभापती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती विराजमान आहे. परंतु राज्यात झालेले सत्तांतर लक्षात घेता या निवडणुकीत भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

भाजपचे १५ जि.प. सदस्य नाराज आहेत. भाजपात दोन गट पडले तर काँग्रेसचा अध्यक्ष होणे शक्य आहे. कॉग्रेसला दहा सदस्यांची गरज आहे. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. अध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी उद्या, शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात नाव निश्चित होईल. काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचा भ्रमणध्वनी आला होता. अध्यक्ष बसवण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. – सतीश वारजूकर, गट नेता, काँग्रेस, चंद्रपूर जिल्हा परिषद