प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल, म्हणाले... | Chandrashekhar Bawankule comment on Prakash Ambedkar Uddhav Thackeray Shivsena faction alliance | Loksatta

प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल, म्हणाले…

सध्या शिवसेना ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होणार असल्याचंही बोललं जातंय.

प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल, म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या शिवसेना ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होणार असल्याचंही बोललं जातंय. याविषयी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी “प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का?” असा प्रश्न विचारला. ते सोमवारी (५ डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? आंबेडकरांनी सगळी मते त्यांच्याकडे घेतली आहेत का? मी परवा आदिवासी नंदूरबारमध्ये होतो. ७५ हजार आदिवासी कुटुंबांनी धन्यवाद मोदीजी हे पत्र लिहिलं. त्यांनी हे पत्र का लिहिलं? आदिवासी समाजातील एका महिलेला राष्ट्रपती केलं म्हणून त्यांनी मोदींचं धन्यवाद केलं.”

“आदिवासी समाज कोणाची जहागिरी आहे का?”

“आदिवासी समाज कोणाची जहागिरी आहे का? तो समाज आहे आणि समाज म्हणूनच निर्णय करत असतो. तो कोण्या नेत्याच्या म्हणण्यानुसार निर्णय करत नाही. त्या समाजाला आपल्या हिताचं काय हे कळतं. मोदी आपलं हित जोपासत आहेत हे त्यांना कळतं. मागासवर्गीय समाजालाही वाटतं की मोदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर संविधानाचं रक्षण करत काम करत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच”

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच आहेत. आज केवळ दाखवण्यासाठी एकत्र बसतील. हे सर्व आतून एकच आहेत. कोणतीही मतं कोणाची जहागिरी नाही. जेव्हा लोकांना वाटतं की हा पक्ष आमच्या हिताचा आहे तेव्हा ते त्या पक्षाला मतं देतात. कोणी म्हणत असेल की मागासवर्गीय मतं माझ्याकडे गठ्ठा आहे आणि मी इकडे देणार, तिकडे देणार, तर मतदार आता कधीही कोणाच्या म्हणण्यावर इकडे तिकडे जात नाही.”

“यांच्या युतीने महाराष्ट्रात काहीही फरक पडत नाही”

“जो स्थानिक पातळीवर जनतेला मदत करतो, जनतेचे कामं करतो त्यांच्यामागे लोकं उभे राहतात. सध्या लोक शिंदे-फडणवीस सरकारच्या मागे आहेत, मोदींच्या मागे लोक आहेत. त्यामुळे यांच्या युतीने महाराष्ट्रात काहीही फरक पडत नाही,” असं बावनकुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!

“उद्धव ठाकरेंनी आता फक्त काँग्रेसची घटना त्यांच्या पक्षाची करावी”

“उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष संपवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व करून टाकल्या आहेत. आता फक्त काँग्रेस पक्षाच्या घटनेची झेरॉक्स काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची करावी. एवढंच शिल्लक राहिलंय, बाकी सर्व झालंय,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:46 IST
Next Story
पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?