सतीश कामत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोक आता आभासी जगात जास्त रमत आहेत. अनेकांचा स्क्रीन टाईम धोक्याची मर्यादा ओलांडू लागला आहे. दुसरीकडे वाचनाची गोडी लागण्याआधीच शाळकरी मुले मोबाईलच अधिक वाचू लागली आहेत. अशा वातावरणात दूर कोकणातल्या एका खेड्यात ‘वाचन कोपरा’ बहरला आहे.

गेली सात वर्षे हा ‘वाचन कोपरा’ उपक्रम अखंडपणे आणि चिकाटीने सुरू आहे. करोना विषाणू साथीच्या संकटात, तर या उपक्रमाची व्याप्ती वाढली आणि त्याच्या जोडीला वाचन कट्टा सुरू झाला. त्यात आता ग्रामस्थही सहभागी होत आहेत. वाचनगोडी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे, त्या गावाचे नाव आहे सालपे आणि हा उपक्रम नेटाने चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे श्रीकांत पाटील. रत्नागिरी जिल्ह्यातील सालपे (ता. लांजा) येथील प्राथमिक शिक्षक श्रीकांत पाटील शाळेत विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन कोपरा’ चालवतात.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वाचनाचे महत्त्व पाटील यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी मुलांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने सालपे प्राथमिक शाळेत ‘वाचन कोपरा’ सुरू केला. या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्रे वाचनासाठी दिली जाऊ लागली. पण याचबरोबर, घरातील मोठी माणसे वाचणार नाहीत, तोपर्यंत लहान मुले त्यांचे अनुकरण करणार नाहीत, हा अनुभव लक्षात घेता वाडीत वाचनाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक होते. म्हणून पाटील यांनी वाडीतील एका माघी गणेशोत्सव मंडळाशी संवाद साधला आणि त्यांच्याकडे ‘वाचन कट्टा’ संकल्पना मांडली.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातून मंडळाच्या सभागृहात डॉ. एपीजे अब्दुल कलाम फिरता वाचनकट्टा सुरू करण्यात आला. यामध्ये सुरुवातीला मंडळाने ३० पुस्तके देणगीतून दिली. गेल्या सात वर्षांत देणगीदारांनी केलेल्या मदतीमुळे ही संख्या सुमारे तीनशेवर गेली आहे.

ग्रामस्थ स्वत:हून पुस्तके बदलून नेण्यासाठी येतील, याची वाट न पाहता पाटील यांनी ही पुस्तके त्यांच्यापर्यत पोहोचवण्यासाठी ‘पुस्तक दूत’ तयार केले. त्यांच्यामार्फत ग्रामस्थांना पुस्तके घरपोच दिली जात आहेत. विशेषतः करोनामुळे टाळेबंदीच्या काळात हा उपक्रम ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरला.

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पाटील यांनी ‘फिरता वाचनकट्टा’ अशीही संकल्पना अमलात आणण्यास सुरवात केली. त्यासाठी कुणाच्या घरी, शाळेत, मंदिरात, परसबागेत, वाडीवस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांसह कुटुंबातील लोकांना एकत्रित आणून पुस्तकांवर चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर, करोनामुळे शाळा बंद असताना मुलांची वाचनाची सवय कमी होऊ नये यासाठी ‘वाचनतास’ ही आणखी एक वेगळी संकल्पना त्यांनी राबवली. त्यानुसार दररोज सायंकाळी ७ ते ८ या एक तासाच्या कालावधीत विद्यार्थी घरात टीव्ही, मोबाईल बंद ठेवून पुस्तकांचे नियमित वाचन करतात.

हा उपक्रम सालपे शेजारच्या केळवली याही गावात सुरू झाला असून व्हॉटस् ॲप समूहाच्या माध्यमातून ही संकल्पना कोल्हापूर जिल्ह्यातही पोचली आणि तेथील आजरा तालुक्यामध्ये अतिदुर्गम अशा कितोडे या गावाच्या वाडीत ‘वाचन कट्टा’ उपक्रम राबवला जाऊ लागला आहे. तेथे पाटील यांनी ३० पुस्तके भेट दिली आहेत.

हेही वाचा : चांगभलं : नैराश्यग्रस्त बळीराजाला आत्मबळ, ‘शेतकरी वाचवा’ अभियानातून १००० हून अधिक शेतकऱ्यांना मदत

या उपक्रमामागील उद्देश विशद करताना पाटील म्हणाले की, स्पर्धा परीक्षा किंवा इतर क्षेत्रात संधी मिळण्यासाठी वाचन आवश्यक असते. ग्रामीण भागात त्याची उणीव तीव्रतेने जाणवते. म्हणून शालेय वयापासूनच मुलांना वाचनाची गोडी लागावी. त्यासाठी पुस्तकेही उपलब्ध असावीत, म्हणून आधी शाळेच्या पातळीवर आणि पुढील टप्प्यात गावातील महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा इतर इच्छुकांना करिअर मार्गदर्शन व्हावे, तसेच ग्रामस्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हे निरनिराळ्या प्रकारचे वाचनाचे उपक्रम सुरू केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून अन्य शाळांमधील शिक्षकही यामध्ये रस दाखवू लागले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changbhala story of reading corner movement in ratnagiri kokan pbs