राज्यात सत्तास्थापन झाली असली तरी सत्तास्थापनेच्या काळातील घटनांची धूळ अद्यापही खाली बसलेली दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे स्वतः निरोप घेऊन आले होते शरद पवारांशी मी बोललो आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ रविवारी पुण्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी बोलताना भुजबळ म्हणाले, “कामकाजांना काही अडचणी येतील, असं मला वाटत नाही. आमच्यासमोर शरद पवार यांचा आदर्श आहे. एकही मंत्री नसताना शरद पवार मुख्यमंत्री असताना सभागृह सांभाळायचे. आता तर सहा मंत्री आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, या अधिवेशनानंतर दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मला वाटतं,” अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे स्वतः निरोप घेऊन आले होते की शरद पवारांशी मी बोललो आहे,” असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “उगीच लोकांचं दिशाभ्रम करण्याचं काम सुरू आहे. जर शरद पवार यांना जायचं असतं तर ते आम्हा सगळ्यांना घेऊन गेले असते ना तिकडे? ते या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनीच सांगितलं असत, चला सगळे तिकडे. भाजपाबरोबर जाऊ. पण, त्यांच्या मनात तसं काही नव्हतं. शरद पवार यांनी पहिल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत जाण्याचं ठरवलं. त्यांना विश्वासात घेऊन दिल्लीत चर्चा केली. कॉमन मिनीमन प्रोग्राम ठरला. एकत्र येण्याच ठरलं. त्यामुळे अजित पवारांनी अजित पवारांना सांगण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवार अध्यक्ष आहेत, त्यांना कुणी अडवलं असतं,” असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal reply to devendra fadnavis remark about ajit pawar bmh