Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil on OBC Reservation : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयाविरोधात (जीआर) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते यावरून सरकार व मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यावर टीका करत आहेत. त्या टीकेला जरांगे देखील वेळोवेळी प्रत्युत्तर देत आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना “मनोज जरांगे पाटलांचा अभ्यास किती? त्याचं शिक्षण काय? तो मराठ्यांचा नेता नाही”, असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “राज्यात कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढलं पाहिजे. ओबीसींवर हल्ला झाला आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करा. तसेच कोणी मराठ्यांना आवाहन करत असेल की ओबीसींना मतदान करू नका तर आम्हालाही तसंच वागावं लागेल.”

छगन भुजबळ म्हणाले, “ते जर म्हणत असतील की ओबीसी उमेदवारांना मतदान करू नका तर मग आपण काय सांगायचं? असं असेल तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीने लढावं लागेल. आतापर्यंत आम्ही आमच्या पक्षाचा सीमा ओलांडल्या नाहीत, कधी काही बोललो नाही. परंतु, अशा रीतीने कोणी वागत असेल कोणी बोलत असेल तर ओबीसी नेत्यांना सुद्धा आपल्या समाजाला असाच आदेश द्यावा लागेल.”

जागे राहा! रात्र वैऱ्याची आहे… भुजबळांचं आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “तुम्ही (मराठा समाज) ५४ टक्के आहात, राज्यात सात टक्के आदिवासी आहेत, १३ टक्के दलित आहेत, असे सगळे मिळून तुम्ही ७४ टक्के झालात. त्यात आता मुस्लिम समाजही तुमच्याबरोबर आहे. हे सगळं पाहिल्यानंतर तुमची आकडेवारी कुठच्या कुठे गेली ते बघा. त्यामुळे मला ओबीसींना एवढंच सांगायचं आहे की एकीने लढा. ही रात्र वैऱ्याची आहे. सर्वांनी जागं राहायला पाहिजे, जागं राहून लढाई लढली पाहिजे. आपला उद्देश एकच आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो शासन निर्णय जाहीर केला आहे तो रद्द करायला हवा.”