अलिबाग – सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरीता असलेल्या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत यावर्षी २८५ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी १७७ प्रकरणांत कर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. बँकाकडून या योजनेला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने, नवउद्यमींची कर्जकोंडी सुटली.
रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी नव उद्योगांना चालना देण्याचे धोरण राज्यसरकारने आखले आहे. होतकरू तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात हा यामगचा उद्देश आहे. ग्रामिण तसेच शहरी भागातील नवउद्यमींना यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने आंतर्गत ५० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सुरवातीला बँकाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नवउद्यमींची कर्ज कोंडी होत होती. प्रस्ताव नाकारण्याकडे सुरुवातीला बँकाचा कल होता. मात्र आता बँकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने कर्ज कोंडीतून नवउद्यमींची सुटका झाली आहे.
राज्याच्या उद्योग विभागा मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणे आणि त्यातून रोजगार निमिर्ती व्हावी, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्राम उद्योग आणि बँकाना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागात लघु आणि कुटीर उद्योग सुरु करण्यासाठी या योजने आंतर्गत ५० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात या योजनेसाठी यावर्षी १ हजार ६०० लघु आणि कुटीर उद्योग निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीने १ हजार ४०० नवउद्दमींनी योजने अतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत. यापैकी १ हजार २०० प्रस्ताव मंजुरीसाठी बँकाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७७ जणांना कर्जवाटप करण्यात आले असून २८५ जणांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ७०० प्रकरणे ही मंजूरीसाठी प्रलंबित आहेत. हे प्रस्तावांना या महिन्या अखेर पर्यंत मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत ७४४ प्रकरणांना मंजूरी देण्याचा उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यातुलनेत ७५४ प्रस्तावांना मंजूरी देऊन कर्ज पुरवठा करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., इ. या बँकानी कर्ज पूरवठ्याला चांगला प्रतिसाद दिला होता. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस हरळय्या यांनी दिली. त्यामुळे यावर्षीचे उद्दीष्टही जिल्हा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
