CJI BR Gavai Wanted To Become Architect: नागपूर जिल्हा न्यायालय बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई खूप भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही वैयक्तिक गोष्टी लोकांसमोर मांडल्या. याचबरोबर त्यांच्या पालकांनी त्यांना वाढवण्यासाठी केलेल्या संघर्षांचाही उल्लेख केला. अतिशय भावनिक आणि दबलेल्या आवाजात सरन्यायाधीशांनी वकिलीच्या क्षेत्रात कसे आले, यावरही भाष्य केले आहे.

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून गेल्या महिन्यात शपथ घेतलेल्या बी. आर. गवई यांनी म्हटले की, “मला आर्किटेक्ट व्हायचे होते. पण माझ्या वडिलांचे माझ्यासाठी वेगळेच स्वप्न होते. त्यांना नेहमीच वाटत होते की मी वकील व्हावे, जे स्वप्न ते स्वतः पूर्ण करू शकले नाहीत. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न सोडून वकिली क्षेत्रात आलो.”

त्यांच्या पालकांबद्दल बोलताना सरन्यायाधीश अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. गवई म्हणाले की, “माझ्या वडिलांनी स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांना स्वतः वकील व्हायचे होते, परंतु स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याने ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकले नाहीत.”

सरन्यायाधीशांनी पुढे सांगितले की, ते एका संयुक्त कुटुंबात वाढले, ज्यामध्ये त्यांच्या अनेक भावंडांचा समावेश होता. सर्व जबाबदारी त्यांच्या आई आणि काकूंच्या खांद्यावर होती.

“जेव्हा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली, तेव्हा माझे वडील म्हणाले होते की, जर तू वकील म्हणूनच काम करत राहिलास तर तू फक्त पैशाच्या मागे धावशील. पण जर तू न्यायाधीश झाला तर तुला आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करता येईल आणि समाजासाठी चांगले काम करता येईल”, असेही सरन्यायाधीश पुढे म्हणाले.

यावेळी ते वडिलांची आठवण सांगताना म्हणाले की, त्यांच्या वडिलांनाही वाटले होते की त्यांचा मुलगा एके दिवशी सरन्यायाधीश होईल, पण हे पाहण्यासाठी ते जिवंत नाहीत. “ते २०१५ मध्ये हे जग सोडून गेले, पण मला आनंद आहे की माझी आई अजूनही जिवंत आहे.”

यादरम्यान सरन्यायाधीशांना लक्षात आले की, त्यांच्या भाषणाने कार्यक्रमास उपस्थित असलेले लोक भावनिक झाले आहेत. तेव्हा वातावरण हलके करण्यासाठी त्यांनी नागपूर जिल्हा न्यायालयात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरुद्ध चेक बाउन्सचा खटला दाखल झाला होता, त्याचा किस्सा सांगितला.