Pune Rape Case Accused Dattatraya Gade arrested: पुण्यातील स्वारगेट बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत असंवेदनशील विधान केले होते. शिवशाही बसमध्ये जी घटना घडली त्यात कुठेही पीडितेकडून प्रतिकार झाला नाही. त्यावेळी बसच्या आजूबाजूला काही लोक उभे होते. पण प्रतिकार न झाल्यामुळे याबाबत कुणाला शंका आली नाही, असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले होते. या विधानानंतर विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली भूमिका मांडत. नव्या मंत्र्यांना एक सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण

माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योगेश कदम आणि संजय सावकारे यांनी केलेले विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, “योगेश कदम यांच्या विधानाला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. स्वारगेट आगार हा गर्दीचा परिसर आहे. तिथे अनेक लोक होते. गुन्हा घडलेली बस बाहेरच होती. पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आला नाही, असे सांगण्याचा योगेश कदम यांचा प्रयत्न होता. तथापि, कदम नवीन मंत्री आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना सल्ला असेल की, अशा प्रकरणात बोलताना आपल्याला अधिक संवेदनशील राहून बोलावे लागेल. कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर चुकीचा परिणाम होतो.”

आरोपीच्या अटकेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोपी लपून बसला होता. मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याला शोधून काढले. लवकरच या संपूर्ण घटनेचा उलगडा होईल. पोलीस आयुक्तांनी या घटनेबाबत काही माहिती दिली आहे. उर्वरित माहिती या टप्प्यावर देणे योग्य होणार नाही. संपूर्ण तपास झाल्यानंतर सर्व माहिती मिळेल.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?

दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोपीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसत आहेत, हे व्रण पाहता त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा. आरोपीनेही याची कबुली दिली आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. त्याने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याची चौकशी करण्याकरता पथक तिथे पाठवण्यात येणार आहे. परंतु प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर व्रण दिसून आले.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis reaction on state minister yogesh kadam statement about swargate bus stand rape case kvg