CM Devendra Fadnavis on loudspeakers: प्रार्थना स्थळ आणि मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारा मांडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देताना त्या म्हणाल्या, प्रार्थना स्थळात जाऊन अजाण म्हणणे हा अधिकार असला तरी भोंग्यावर अजाण म्हणण्यास न्यायालयाने विरोध केला होता. भोंगा हा कुठल्याही धर्माशी निगडित नाही, असे न्यायालयाने सांगितल्याची आठवण फरांदे यांनी करून दिली. या लक्षवेधीला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय मांडत असताना रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे काय करायचे? असे सांगून संजय राऊत यांना टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव घेतले नसले तरी संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदावर याआधीही फडणवीसांसह अनेक महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कधी कधी स्वकीयांवरही टिकेचे बाण सोडत असतात. त्यानंतर दिवसभरात त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. यावर महायुतीच्या अनेक नेत्यांनी सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे, अशी गमतीत प्रतिक्रया दिली होती. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संजय राऊत यांना सभागृहात टोला लगावला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

प्रार्थना स्थळ आणि मशिदीवरी भोंग्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० वाजण्याच्या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे, अशी सध्या कायद्याची तरतूद आहे. मात्र याचा अवलंब सध्या होताना दिसत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीकरताच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्याठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल. तसेच या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही? हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल.

जर पोलीस निरीक्षकांनी याचे तंतोतंत पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीचे उत्तर देताना स्पष्ट केले

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis slams sanjay raut daily media briefing while talking about loudspeaker on mosque kvg