राहाता: राज्यातील साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र सरकारने त्यांना मदतीचा हात दिला, मात्र आता शेतकऱ्यांवर संकट असताना काही कारखानदारांना नफ्यातून फक्त ५ रुपये देणेही जड जात आहे, शेतकऱ्यांच्या उसात काटा मारणारे कारखाने मी शोधून काढले आहेत. त्या कारखान्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणी येथे रविवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दिला.
साखर कारखान्यांमध्ये ३० हजार कोटींचे व्यवहार होत आहेत. सरकार कारखान्यांना १० हजार कोटी देत आहे, तर मग तुमच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी ५ रुपये बाजूला काढून ठेवा. आम्ही ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीमधील पैसे शेतकऱ्यांचे आहेत आणि नफ्यातील पैसे हे कारखान्यांचे आहेत. जवळपास २०० कारखाने आहेत. त्यामध्ये प्रत्येकी एका कारखान्याला आपण २५ लाख रुपये शेतकऱ्यांना वेगळे काढून ठेवायला सांगितले तर काही लोकांनी यावर शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे वसूल करता? असे म्हणत मोठा गहजब केला.
परंतु सरकारने शेतकऱ्यांकडून नाही तर कारखान्यांच्या नफ्यातून पैसे मागितले होते. जो शेतकरी तुमच्याकडे ऊस टाकतो, शेतात राबतो, त्या शेतकऱ्यांवर आपत्ती आली आणि तुम्हाला ५ रुपये द्यायला सांगितले तर तुम्ही मागेपुढे पाहता का, असा प्रश्न उपस्थित करून फडणवीस म्हणाले की, आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत. त्या साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारला जातो, त्या कारखान्यांना मी दाखवणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा काटा मारून मारून पैसे जमा करता आणि शेतकऱ्यांसाठी २५ लाख मागितले तर तुमची ते देण्याची दानत नाही.
तुम्ही या कारखान्यांचे मालक नाहीत, तर आमचा शेतकरी या कारखान्यांचे मालक आहेत. त्यामुळे त्यांच्या हिताचे रक्षण हेच आमचे प्राधान्य आहे. आपत्तीकाळात काही लोक राजकारण करत आहेत, पण सरकार शेतकऱ्यांसाठी ठामपणे काम करत राहील. केंद्र सरकारकडूनही भरीव मदतीचा आराखडा तयार होत आहे. शेतकरी व कारखानदारांना एकतेचा संदेश देत सांगितले, जनतेने आम्हाला सेवा करण्यासाठी पाठवले आहे. आम्ही सेवा करू, राजकारण नव्हे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.