अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शनिवारी ( ३० डिसेंबर ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, राम मंदिर सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही. असं बोलणाऱ्यांना राम भक्त उत्तर देतील. आता घरी बसलेले आहेत. राम भक्त कायमचे घरी बसवतील. म्हणून विचार करून विधानं करावीत. अयोध्येतील राम मंदिर हा करोडो भक्तांच्या अस्मितेचा विषय आहे.”

हेही वाचा : “बाळासाहेबांचं ते एक वाक्य…”, बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले 

“मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”

“आधी काहीजण ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकीन तारीख नहीं बताएंगे’ असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायचे. मात्र, मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली आहे. आरोप करणाऱ्यांची अवस्था ‘मुंह में राम बगल में छुरी’ अशी आहे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा : “कदाचित फडणवीसांच्या वजनानेच बाबरी…”, उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले, “मी त्यांना धन्यवाद देतो की…”

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही. अयोध्येत राम मंदिर होणं, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी शिवसेनेनं मोठा संघर्ष केला आहे. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यानं बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं असून अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यामुळे राम मंदिर उद्घाटन सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये,” अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती.