एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिवसेनेच्या याच दाव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले आहे. एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन, असे मी याआधीच सांगितले आहे; असे शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले आहे.
हेही वाचा >>> “युती करायची की नाही हे…”, नागपुरात शरद पवारांचं मोठं विधान
“बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असे म्हटले जात आहे. पण मी म्हणतो एकही आमदार पडणार नाही. याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला, तर मी राजकारण सोडून निघून जाईल; असे मी तेव्हाच जाहीरपणे सांगितले आहे,” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच पुढे बोलताना कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? हे सगळं जनता ठरवत असते. मतदार ठरवत असतात, अशी खोचक टीकादेखील शिंदे यांनी केली.
हेही वाचा >>> Mohammed Zubair : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर
“आम्ही घेतलेली भूमिका सामान्यांना न्याय देणारी आहे. आमची भूमिका सर्वसामान्य लोकांना पटणारी आहे. मला आठवत आहे. मी दिल्लीहून पुण्याला उतरलो. नंतर पंढरपूरला निघालो. पुण्याच्या रस्त्याला दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते. पंढरपुरात दहा लाखांपेक्षाही जास्त गर्दी होती. सुरक्षेच्या कारणामुळे तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका, असे मला पोलिसांनी सांगितले. मी गाडीच्या बाहेर आलो. सर्वांना अभिवादन करत होतो. वारकरी हेच माझे रक्षक आहेत, असे मी तेव्हा पोलिसांनी सांगितले. मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारा मोठा असतो,” असे म्हणत सध्या स्थापन झालेल्या शिंदे गट-भाजपाच्या सरकारला लोकांचा पाठिंबा आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
हेही वाचा >>> रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोगळा, अमेरिकेकडून निर्बंधांमध्ये सूट
तसेच, “मी कधीही डगमगलो नाही. मी सुरक्षेची परवानगी केली नाही. परवा केली असती तर मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. मी जी भूमिका घेतली, ती लोकांनी स्वीकारली आहे. त्यावेळी आम्हाला विचारण्यात आलं, की हे कशासाठी सुरु आहे. आमचा यामध्ये स्वार्थ नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं. माझ्यासोबत सात मंत्री आले. विरोधी पक्षातून सत्तेकडे जाण्याचा ओघ असतो. मात्र इथे उलटं झालं. सत्तेतील माणसं बाहेर पडली. एक-दोन नव्हे तर पन्नास लोक बाहेर पडले,” असे शिवसेनेतील बंडखोरीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले.