उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी रविंद्र वायकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रविवारी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रविंद्र वायकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. त्यावेळी आपण विकास कामांना चालना देण्यासाठी एकनाथ शिंदेंसह आलो आहोत असं वायकर यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी रविंद्र वायकर यांच्या निर्णयाचं स्वागत केलं तसंच नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार रविंद्र वायकर यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वायकर यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“रविंद्र वायकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचार जोपासणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. गेली ४० ते ५० वर्षे बाळासाहेबांसोबत त्यांनी शिवसेनेचे काम केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेच शिवसेनेचं काम करतोय. बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यभरात पोहोचवण्याचे काम आपण करतोय. मी पूर्ण वायकर कुटुंबाचे स्वागत करतो. वायकर यांनी मला त्यांच्या मतदारसंघातील समस्या सांगितल्या आहेत,” असे शिंदे म्हणाले.

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न येताच रविंद्र वायकर भावूक, म्हणाले..,”ते मतदारसंघात आल्यावर…”

उद्धव ठाकरेंना टोला

“सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही काम करत असतो. आपल्या मतदारसंघातील कामे झाली पाहिजेत म्हणून त्यांनी आज आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माझ्यात आणि त्यांच्यात जे काही समज गैरसमज होते ते एकत्र बसल्यावर दूर झाले. आमच्यात तिसराच माणूस गैरसमज निर्माण करत होता. आमच्यामध्ये एकमेकांबद्दल जो संभ्रम होता तो गेला आहे. आम्ही एकत्र बसल्यानंतर तो संभ्रम गेला आहे.”, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.