मोहनीराज लहाडे , लोकसत्ता
नगर : नगर जिल्ह्याचे विभाजन व नामांतर करण्याच्या विरोधात महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांनी भूमिका जाहीर केली असतानाच लगेच भाजपचे दुसरे नेते, माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी विखे पितापुत्रांच्या विरोधात भूमिका जाहीर केल्याने नगर जिल्ह्याचे विभाजन आणि नामांतराच्या मुद्दय़ावर भाजपमधील मतभेद, मतमतांतरे उघड झाली आहेत.
या दोन्ही विषयावर भाजपमध्ये नेत्यांमध्येच एकमत नसल्याने पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण होणारी आहे. आपण पालकमंत्री असताना त्यावेळी विरोधी पक्षात असताना राधाकृष्ण विखे यांनी पाठिंबा दिला होता, आता ते पालकमंत्री झाल्यावर विरोधाची दुहेरी भूमिका का घेत आहेत, याचे आपल्याला कोडे पाडल्याचे सांगत टोला लगावला आहे.
अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून नगरचे नाव बदलून ते अंबिकानगर ठेवावे, जैन समाजाकडून आनंदनगर ठेवावे, फुले ब्रिगेडने महात्मा फुले नगर असे नाव ठेवावे यासह विविध समाजाच्या वतीने विविध नावे पुढे केली जाऊ लागली आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राधाकृष्ण विखे व राम शिंदे या भाजपमधील दोन नेत्यांतील मतभेद वेळोवेळी पुढे आलेले आहेत. जिल्ह्यातील भाजपचे विधानसभेतील संख्याबळ घटण्यास विखेच कारणीभूत असल्याची तक्रारही राम शिंदे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप श्रेष्ठींनी विखे यांना महसूल खात्याचे मंत्रीपद देऊन त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर पराभूत झालेल्या राम शिंदे यांचीही विधान परिषदेवर वर्णी लावत त्यांचेही पुनर्वसन केले.
महसूल मंत्रीपद स्वीकारल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्येच बोलताना विभाजन होणार नाही, विभाजनापेक्षा इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांनी सुरुवातीला जिल्ह्याची एकत्रित ताकद कमी होते, असे सांगत विभाजनाला विरोध केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी काहीशी भूमिका बदलत विकासाचा ठोस आराखडा असेल तर विभाजनाला आपला विरोध नाही, असे सांगितले होते. याबरोबरच खासदार विखे यांनी नामांतराने जिल्ह्याचे प्रश्न संपणार आहेत का? जिल्ह्याबाहेरील लोकांनी नगरच्या नामांतरावर मते व्यक्त करू नयेत, जिल्ह्यातील नेते हा विषय हाताळण्यास सक्षम आहेत, अशी भूमिका मांडली होती.
भाजपचे दुसरे नेते राम शिंदे यांनी विभाजन आणि नामांतर झालेच पाहिजे अशी अशी मागणी केली आहे. आपण पालकमंत्री असतानाच विभाजनाचा प्रस्ताव तयार करून तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता, तो अंतिम टप्प्यातही आला होता, मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे अशा इतर जिल्ह्यांच्या विभाजनाचा विषय पुढे आल्याने नगरचा विषय मागे पडला असा दावाही त्यांनी केला.
जिल्ह्याच्या बाहेरील लोकांनी नगरच्या नामांतराबद्दल मते व्यक्त करू नयेत, या खासदार विखे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेत राम शिंदे यांनी टोलेबाजी केली. मते व्यक्त करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, नगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर ठेवण्याविषयी स्थानिक पातळीवर सहमती घडवून आणू. औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास बरीच वर्षे लागली. नगरसाठीसुद्धा आपण संयम ठेवून एकमत घडून आणू, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केल्याने आगामी काळातही नगरचे विभाजन आणि नामांतर चर्चेत राहील, हे स्पष्ट होते आहे.
खासदार सुजय विखे यांचा सवाल: महसूल मंत्रीपद स्वीकारल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्येच बोलताना विभाजन होणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांनी सुरुवातीला जिल्ह्याची एकत्रित ताकद कमी होते, असे सांगत विभाजनाला विरोध केला होता. त्यानंतर भूमिका बदलत विकासाचा ठोस आराखडा असेल तर विभाजनाला आपला विरोध नाही, असे सांगितले होते. याबरोबरच खासदार विखे यांनी नामांतराने जिल्ह्याचे प्रश्न संपणार आहेत का? जिल्ह्याबाहेरील लोकांनी नगरच्या नामांतरावर मते व्यक्त करू नयेत, जिल्ह्यातील नेते हा विषय हाताळण्यास सक्षम आहेत, अशी भूमिका मांडली होती.
भूमिका का बदलता?
आपण पालकमंत्री असताना त्यावेळी विरोधी पक्षात असलेले राधाकृष्ण विखे यांनी विभाजनाला पाठिंबा दिला होता, आता ते स्वत: पालकमंत्री झाल्यावर दुहेरी भूमिका घेत का घेत आहेत, हे आपल्याला सांगता येत नाही, ते एक कोडेच आहे. खासदार विखे यांनी जरी काही भूमिका घेतली असली तरी मी माझ्या मागणीवर ठाम आहे, यामागण्यांसाठी आपण पक्षाच्या पातळीवर पाठपुरावा करु असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या बाहेरील लोकांनी नगरच्या नामांतराबद्दल मते व्यक्त करू नयेत, या खासदार विखे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेत राम शिंदे यांनी टोलेबाजी केली.