सोलापूर : वीर सावरकर तुरूंगात असताना त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जे हाल झाले, त्याबद्दल काँग्रेस पक्षाला कृतज्ञता वाटते. मात्र त्याचवेळी सावरकरांनी तुरूंगातून सुटण्यासाठी ब्रिटिश सरकारची सहावेळा माफी मागितली आणि नंतर दरमहा ६० रूपये पेन्शनही घेतली, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही, असे विधान काँग्रेसचे माजी खासदार, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आयोजित व्याख्यानमालेत व्याख्यान देण्यासाठी डॉ. मुणगेकर आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सावरकरांविषयी भूमिका मांडली.
हेही वाचा >>> सांगली : नागरी प्रश्नासाठी इस्लामपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धडक मोर्चा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, मी माफी मागणार नाही, मी सावरकर नाही, गांधी आहे, असे विधान केले होते. त्यावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडून आंदोलनही छेडले होते. तर महाविकास आघाडीतही मतभेद झाले होते. तेव्हा विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केलेल्या टिप्पणीनंतर आता राहुल गांधी व काँग्रेसकडून सावरकर मुद्यावर मौन पाळले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले, सावरकर सेल्युलर जेलमध्ये ११ वर्षे शिक्षा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल झाले. त्याबद्दल काँग्रेसला कृतज्ञताच वाटते. मात्र ही जशी एक बाजू अहे, तशी १९२१ ते १९२४ या दरम्यान सेल्युलर जेलमध्ये असताना सावरकरांनी तुरूंगातून सुटका होण्यासाठी ब्रिटिश सरकारची सहावेळा पत्रे लिहून मागितली होती. त्यानंतर १९२४ ते १९३७ पर्यंत सावरकर ब्रिटिश सरकारकडून दरमहा ६० रूपये पेन्शनही घेत होते, हीसुध्दा वस्तुस्थिती आहे. हा सावरकरांचा अपमान नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. यात सावरकरांविषयी काँग्रेसची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असल्याचे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.