राज्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेस-वे वर खासगी वाहनांना अडवलं जात असून फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना जाण्याची परवानगी दिली जात आहे. फक्त एक्स्प्रेस वे नाही तर जुन्या मुंबई-पुणे हायवेवरही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईतील नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये तसंच पुणे किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी मुंबईत प्रवेश करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

खालापूर, कळंबोली, कामशेत या टोलनाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस लोकांची ओळखपत्रं तपासत आहेत. जे लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठवलं जात आहे.

मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त करोनाची लागण झालेले रुग्ण सापडले असून या दोन शहरांमध्ये सर्वात जास्त चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत सुट्टी मिळाली असल्याने मुंबईतील अनेक नागरिक पुणे, सातारा. कोल्हापूर, कोकण तसंच इतर ठिकाणी आपल्या गावी जात आहेत. लोकांना घरात थांबण्याचं आवाहन केलं जात असतानाही लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.