देशभरामध्ये कोरनाचा संसर्ग वाढताना दिसत आहेत. त्यातच महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या तीन हजारच्या वर पोहचली आहे. राज्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी अशी पहिल्या फळीतील करोना योद्धे या संकटाला तोंड देत आहेत. जनतेने घरातच थांबून प्रशासनाला आणि यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन केलं जात आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नाशिकमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून अगदी गाड्या जप्त करण्यापासून ते कठोर कारवाई करण्यापर्यंत अनेक आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच एसपी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांना दोन व्यक्तींनी आदेश दिले आणि त्यांना ते ऐकावे लागले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी सोशल नेटवर्किंगवरुन पोलीस जनतेशी संवाद साधताना दिसत आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे, मास्क घालूनच घराबाहेर पडणे असे अनेक सल्ले पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. याचसंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील ड्युटीवरुन आपल्या घरी येतात तेव्हा घराच्या दारात त्यांची गाठ पडते ती घरातील एसीपीशी म्हणजेच त्यांच्या मुलाशी. विश्वास नांगरे पाटील यांची दोन्ही मुले जान्हवी आणि रणवीर हे आपल्या वडिलांना, “डॅडी, तुम्ही बाहेर सीपी असाल तरी या घरातले आम्ही अ‍ॅण्टी करोना पोलीस आहोत,” असं सांगताना दिसतात. ‘आधी फोन सॅनिटाइज करुन घ्या, घरात येण्याआगोदर हात धुवून घ्या आणि घरात आल्यावर थेट बाथरुममध्ये जा,’ असा सूचना वजा आदेशच हे दोघे आपल्या वडिलांना देताना दिसत आहेत. जनजागृती करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी मुलांबरोबरचा हा व्हिडिओ शूट केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या एसीपी मोहीमेचे कौतुक त्यांनी या व्हिडिओमधून केलं आहे. या व्हिडिओला ट्विटरवर तीन हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर फेसबुकवर दीड हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

शुक्रवारपर्यंत (१७ एप्रिल २०२०) नाशिक जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ५५ वर पोहचला असून अद्याप अनेक संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. बाधितांमध्ये मालेगाव महापालिका क्षेत्रात ४७, नाशिक महापालिका क्षेत्रात पाच तर इतर भागातील तीन रुग्णांचा समावेश आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.