कराड : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कराड, वाखाण ते कोरेगाव, कार्वे अशा ५० कोटींच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची मोजणी थांबली आहे. कराड नगरपालिका हद्दीतील वाखाण परिसरात मोजणीसाठी गेलेल्या भूमिअभिलेख कार्यालय व नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करून मोजणीचे हे काम बंद पाडले आहे. दरम्यान, कोरेगाव व कार्वे दरम्यान, सुरू असणारे रस्ता रुंदीकरणाचे कामही संथगतीने सुरू आहे.

साधारण ५० कोटी रूपये खर्चाचे हे काम थांबल्याने आता यातून स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन कसा मार्ग काढते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. विधानसभा निवडणुकीआधी या कामाचा नारळ फोडण्यात आला. या कामासाठी ‘कराड दक्षिण’चे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. मात्र, सुरूवातीला ज्या उत्साहाने व गतीने या कामास सुरूवात झाली, सध्या तशी स्थिती आज दिसत नाही. रस्ता रुंदीकरण विरोधी कृती समिती व शेतकरी संघटनेने या कामास खडा विरोध दर्शविला आहे.

कराड वाखाणातील बाधित शेतकरी अनुपस्थित असताना, प्रशासनाकडून मोजणीचे काम सुरू करण्यात आल्याने ते चिडले. मोजणीसाठी आदल्या रात्री शेतकऱ्यांना अचानक नोटीस देण्यात आल्याने कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी संघटनेने मोजणीसाठी आलेल्या भूमी अभिलेख व नगरपालिका अधिकाऱ्यांना मोजणी करू दिली नाही. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनास वारंवार सांगूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. किती जमीन जाणार, रस्ता कसा होणार, भरपाई कशी मिळणार याबाबत प्रशासनाकडून माहिती दिली जात नसल्याने रस्ता रुंदीकरणाविरोधात शेतकऱ्यांनी एकजूट होऊन प्रशासनास धारेवर धरण्यात आले.

कोणतीही नोटीस किमान एक आठवडा अगोदर दिल्याशिवाय ती स्वीकारणार नसल्याचे शेतकऱ्यांनी ठणकावले. रस्ता रुंदीकरण व प्रचलित रस्ता बनवण्याविषयी काय दिशा असेल याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. याबाबत तीन ऑक्टोबरला मोजणी घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. वाखाण ते टेंभू पूल, कोरेगाव व कार्वे असा संपूर्ण रस्ता चौपदरी होणार असे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, हा रस्ता चौपदरी होणार नाही. वाखाण परिसर हा कराड नगरपालिका हद्दीत येत असल्याने यातील काही भाग हा ग्रीन झोनमध्ये असल्याने तिथे रस्ता चौपदरीकरण होणार नसल्याचे बांधकाम विभागातून सांगण्यात आले.