सातारा : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील तुपेवाडी (ता. माण) येथे म्हसवड व सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारात धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १० लाख ११ हजार ९५० रुपये किमतीचा तब्बल ४० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी शहाजी दाजी तुपे (तुपेवाडी, वरकुटे, ता. माण, जि. सातारा) यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली.

स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी तुपे यांनी आपल्या मालकीच्या शेतात विक्रीसाठी गांजाच्या झाडांची लागवड व जोपासना केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने म्हसवड पोलिसांबरोबर संयुक्त कारवाई केली. सातारा जिल्हा पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध अमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध मोहिमेला गती दिली आहे. या कारवाईमुळे माण तालुक्यातील अमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. कडुकर यांनी कारवाईतील यशस्वी पथकाचे विशेष अभिनंदन केले.

पथकाने तुपेवाडी येथे छापा टाकला असता, शेतात एकूण ४० गांजाची झाडे सापडली. तपासात ही झाडे ओलसर अवस्थेत, हिरवट पाने, फुले, बीज आणि काड्यांसह सुकवण्यासाठी टांगलेली असल्याचे दिसून आले. त्याचे वजन ४०.४७८ किलो इतके निघाले. सदर गांजाची बाजारातील किंमत रुपये १० लाख ११ हजार ९५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखालील कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फर्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, म्हसवड पोलीस ठाण्याचे अक्षय सोनावणे, उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, तसेच अंमलदार व फॉरेन्सिक टीम सहभागी होती. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. कडुकर यांनी कारवाईतील यशस्वी पथकाचे विशेष अभिनंदन केले.

सातारा जिल्हा पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध अमली पदार्थांच्या व्यवसायाविरुद्ध मोहिमेला गती दिली आहे. या कारवाईमुळे माण तालुक्यातील अमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.