अहिल्यानगर: महिलेस विवाहाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले तसेच फसवणूक केली, या आरोपावरून शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेला पोलीस निरीक्षक शहरातच नियुक्त आहे. पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने शहरासह जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाची बदली शहरातील पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
हा गुन्हा मनोर (पालघर) पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. पीडित महिला ३० वर्षीय असून मूळ पश्चिम बंगालमधील आहे. महिला कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहे. मार्च २०२३ मध्ये मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तिची पोलीस निरीक्षकाशी ओळख झाली. त्याने तिला त्याच रेस्टॉरंटमध्ये नोकरी दिली. तिला अल्पावधीतच बढती देत तिचा विश्वास संपादन केला. हा पोलीस निरीक्षक पूर्वी मुंबईत नियुक्त होता.
या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीतनंतर प्रेमसंबंधात झाले. ऑगस्ट २०२३ मध्ये पोलीस निरीक्षकाने महिलेला मनोर (पालघर) येथील फार्महाऊसवर नेऊन तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक हा त्याच फार्महाऊसवर दुसऱ्या महिलेसोबत आढळून आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत जाब विचारला असता त्याने पीडितेला टाळायला सुरुवात केली. नंतर आपल्यातील संबंध विसरून जा, असे सांगत शिवीगाळ केली, पोलीस केस करण्याची धमकी दिली. नंतर जिवे मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झालेला पोलीस निरीक्षक मूळ पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. हा गुन्हा मुंबई व पालघर हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी मनोर (पालघर) पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली.
नियंत्रण कक्षात बदली
लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाची बदली शहरातील पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. सकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांकडून पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल झालेला पोलीस निरीक्षकही संबंधित महिलेच्या विरोधात उद्या, मंगळवारी पोलिसांकडे खंडणीची फिर्याद दाखल करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली.
