सांगली : आपली भावकी, गावकी आपल्या प्रभागात आहे का, हे पाहण्यासाठी बुधवारी भावी नगरसेवक आणि त्यांच्या चाहत्यांची एकच गर्दी महापालिकेत उसळली.

सांगली महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा पाहण्यासाठी बुधवारी महापालिका मुख्यालयासह चारही प्रभाग समिती कार्यालयात जाहीर करण्यात आला. या प्रारूप आराखड्याबाबत सूचना व हरकती दाखल करण्याची 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. राज्यातील ड वर्ग महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य शासनाकडील नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचना निश्चिती करून तसा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयोगानेही चार दिवसांपूर्वी मान्यता दिली होती.

महापालिका प्रशासनाने बुधवारी सकाळी दहा वाजता प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा महापालिका मुख्यालयासह चारही प्रभाग समिती कार्यालय व महापालिका संकेतस्थळावर प्रसिध्द केला. यात केवळ महापालिका क्षेत्रातील एकूण 20 प्रभागांची सीमा रेषा व लोकसंख्या यांचा समावेश आहे. सन 2011 मधील जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.

मागील प्रमाणेच प्रभाग निश्‍चित होण्याची चिन्हे असून एका प्रभागात सर्वसाधारण 25 हजार मतदार आहेत. चार सदस्यांसाठी एक प्रभाग असून यामध्येच आरक्षण निश्‍चित होणार आहे. यामुळे आरक्षण कसे पडते यावर पुढील राजकीय मांडणी होणार असली तरी इच्छुकांनी आता तयारी सुरू केली आहे. प्रस्थापितांनी महिला आरक्षण पडले तर घरातीलच महिलेला संधी देण्याची तयारी ठेवली आहे.

जाहीर झालेल्या प्रारूप आराखड्याबाबत दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सूचना व हरकती नोंदविता येणार आहेत. या सूचना व हरकती स्वीकारण्यासाठी वरील सर्वच ठिकाणी निवडणूक कक्ष उभारण्यात आला असून तिथे वरिष्ठ अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. या प्रारूप आराखड्याबाबत दाखल सूचना व हरकती यावर सांगली जिल्हाधिकारी अथवा प्राधिकृत अधिकारी यांच्या समक्ष दि. 16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. याबाबतचे ठिकाण व वेळ सांगली जिल्हाधिकारी निश्चित करणार आहेत. यानंतर अंतिम प्रभाग रचना विभागीय आयुक्तांकडून प्रसिध्द केली जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द झाल्यानंतरच आरक्षण निश्चित केले जाणार आहे.