एजाजहुसेन मुजावर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूर : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या आपत्तीसाठी भरपाईची मागणी होऊ लागली असतानाच सोलापुरातील २८१७ शेतकरी अद्याप मागील अवकाळीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याचे पुढे आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळय़ात पावसाने निराशा केल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. तत्पूर्वी, जानेवारी ते जानेवारी दरम्यान जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाच्या अहवालानुसार करमाळा, माढा, मोहोळ आदी तालुक्यांतील २८१७ शेतकऱ्यांच्या १७४३.८४ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली होती. त्यापोटी शासनाने तीन कोटी ९० लाख रुपयांची मदतही जाहीर केली होती. मात्र ही मदत अद्याप बाधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.

हेही वाचा >>>“सोळंकेंना ‘प्रदेशाध्यक्ष’पदाचा दिलेला शब्द पाळला नाही,” अजित पवारांची टीका; जयंत पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

ही भरपाई प्रतीक्षेत असतानाच दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याला अवकाळीचा पुन्हा तडाखा बसला आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका, हरभरा, द्राक्षे, कांदा आदी पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून, प्रशासनाने बाधित शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत. अंदाजानुसार सहा तालुक्यांमध्ये सुमारे ३७ हजार शेतकऱ्यांच्या २९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील २७ हजार ३६० शेतकऱ्यांच्या २१ हजार २४७ हेक्टर शेतीला बसला आहे. तसेच ‘ज्वारीचे कोठार’ असलेल्या मंगळवेढय़ात ६५६६ शेतकऱ्यांच्या ५७५५ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकावर पाणी फिरले आहे. या आपत्तीसाठी भरपाईची मागणी होऊ लागली असतानाच मागील अवकाळीच्या भरपाईकडेही जिल्ह्यातील २८१७ शेतकरी डोळे लावून बसल्याचे पुढे आले आहे.

पीक विम्यापासूनही वंचित

एकीकडे अशी संकटे झेलत असताना सरत्या खरीप हंगामातील हाताला न आलेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडून पात्र ठरलेल्यांपैकी एक लाख १६ हजार २०६ शेतकऱ्यांना २५ टक्क्यांपर्यंतच म्हणजे ८० कोटी ७७ लाख ४५ हजार ३६४ रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी अद्यापी ४६ हजार ५२३ बाधित शेतकरी विम्याच्या रकमेपासून पूर्णत: वंचित आहेत. सोयाबीनसह मका व बाजरीच्या नुकसान भरपाईपोटी एकूण एक लाख ३८ हजार ७८३ बाधित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मंजूर रक्कम अदा झाली नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे विमा कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage to agricultural crops due to unseasonal rains in the district two days ago solhapur amy