Ajit Pawar On Manikrao Kokate Remark Playing Rummy in Assembly Session : विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी सुरू असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात बाकावर बसून मोबाईलवर ऑनलाईन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून मंत्री कोकाटेंवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
दरम्यान, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत थेट कारवाई संदर्भात सूचक इशारा दिला आहे. कृषीमंत्री कोकाटे यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करणार असून त्यानंतर पुढील निर्णय आपण घेणार आहोत, असं अजित पवार यांनी आज (२४ जुलै) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रमी खेळतानाचं कथित व्हिडीओ प्रकरण मंत्री कोकाटे यांना भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत तुमची भूमिका काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता अजित पवार म्हणाले की, “कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत विधानसभा अध्यक्षांनी आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी देखील चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती मला मिळाली आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“कृषीमंत्री कोकाटे मला अद्याप समक्ष भेटलेले नाहीत. बुधवारी दुपारी मी या ठिकाणी पोहचलो आहे. आज खरं तर दिल्लीत एक महत्वाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती देखील महत्वाची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, कृषीमंत्री कोकाटे यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की ते गेम खेळत नव्हते वैगेरे. माझी आणि कोकाटे यांची अद्याप भेट झालेली नाही. पण सोमवारी त्यांची आणि माझी भेट होईल”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“त्यानंतर मी निर्णय घेणार…”, अजित पवार
“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आपण नेहमी भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि मी देखील सर्वांना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री कोकाटे यांच्याकडून अशाच प्रकारची गोष्ट घडली. तेव्हा देखील मी दखल घेत सांगितलं होतं की असं होता कामा नये. मात्र, तरीही दुसऱ्यांदा पुन्हा असाच प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना जाणीव करून दिली की दोनदा झालंय तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका. मात्र, आता या घटनेबाबत कोकाटे म्हणतात की ते रमी खेळत नव्हते. त्या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय खरं आहे ते सत्य समोर येईल. आता सोमवारी किंवा मंगळवारी मंत्री कोकाटे यांना मी बोलावून समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे”, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
तथ्य आढळलं तर काय कारवाई करणार?
रमी खेळतानाचं कथित व्हिडीओत जर तथ्य आढळलं तर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी सांगितलं की, “जर यामध्ये तथ्य आढळलं तर तो निर्णय आमच्या अखत्यारीमध्ये असेल तर मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व मिळून पुढील निर्णय घेऊ. बाकी विरोधक कोण काय बोलतंय आम्ही त्याला महत्व नाही. महायुतीला कमीपणा येईल असं विधान कोणाकडूनही होता कामा नये. मी कोकाटेंना सांगितलं होतं की इजा झालं, बिजा झालं आता तिजाची वेळ आणू नका”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कृषीमंत्री कोकाटे यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?
कृषीमंत्री कोकाटे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असले तरी व्हिडीओमध्ये ते फोनवर पत्त्यांचा एक गेम खेळत असल्याचं स्पष्ट दिसत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. यावरून कोकाटे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “तो रमीचा डाव नाही. त्या दिवशी सभागृहात माझं काम होतं. संध्याकाळी सहा वाजता माझी लक्षवेधी होती. अशा वेळी सहाय्यकाकडून काही माहिती मागवायची असल्यास त्यांना फोन करावा लागतो, कधी एसएमएस करावा लागतो. मध्येच कोणाला बोलावता येत नाही. त्यासाठी मो मोबाईल सुरू केला. मात्र मोबाइलवर गेम आला जो मला स्किप करता आला नाही. नवीन फोनवर गेम स्किप करता आला नाही.”
“संपूर्ण व्हिडीओ तुमच्यासमोर आलाच नाही”
माणिकराव कोकाटे म्हणाले, “मी मोबाइलवर रमी खेळत नव्हतो. पॉप अप झालेला गेम मला स्किप करता आला नाही. काही सेकंद माझ्या फोनच्या स्क्रीनवर तो गेम दिसला आणि तेवढाच व्हिडीओ तुमच्यासमोर आला. संपूर्ण व्हिडीओ तुम्हा माध्यमांसमोर आला नाही किंवा तुम्ही तो दाखवला नाही. परंतु, नवीन फोन घेतल्यावर असे गेम फोनवर पॉप अप होतात. मोबाइलमध्ये कुठलाही गेम पॉप अप झाल्यावर ३० सेकंद तो स्किप करता येत नाही. काही सेकंद तो गेम माझ्या फोनवर होता. त्याचदरम्यान १८ सेकंदांचा व्हिडीओ तुमच्यासमोर आला. कोणीतरी त्याचं चित्रण केलं आणि व्हिडओ व्हायरल केला.”