Ajit Pawar On Yavat Violence : पुणे जिल्ह्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला होता. सोशल मीडियावर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर दोन गट आमने-सामने आले होते. त्यानंतर तणाव निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यता आलेला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा यवतमध्ये जाऊन आढावा घेतला आहे. तसेच ही घटना नेमकं कशामुळे घडली? याची माहिती सांगत सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही अजित पवार यांनी नागरिकांना केलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“काही दिवसांपूर्वी यवतमध्ये जी घटना घडली होती, त्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन भाषणं केली. त्यानंतर सर्व शांत झालं. मात्र, कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये एक घटना घडली, त्या घटनेबाबत एका व्यक्तीने स्टेटस ठेवलं आणि त्यानंतर या ठिकाणी तणाव निर्माण झाला. मात्र, मी नागरिकांना सांगू इच्छितो की यवतमधील परिस्थिती पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रणात आणलेली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरवरून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहेत. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख देखील या ठिकाणी आहेत. सध्या सर्व परिस्थिती आटोक्यात आहे”, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“आता मी काही सहकार्यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत यवतमध्ये अशा प्रकारची घटना कधी घडली नव्हती. या ठिकाणी जातीय सलोखा राखून आम्ही राहत आलेलो आहोत, असं येथील काहींनी सांगितलं. मात्र, या घटनेनंतर आज या ठिकाणी बाजार असतो, तो देखील बंद झाला आहे. मी सर्वांना आवाहन करतो की अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नका. या ठिकाणी काहीही भितीचं वातावरण नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सर्व मिळून एकमेकांना सहकार्य करू, ज्याने कोणी जी पोस्ट टाकली, त्याचा आणि यवतकरांचा फारसा संबंध नाही. तो व्यक्ती काही वर्षांपूर्वी नांदेडवरून आलेला असून तो या ठिकाणी बिगारीचं काम करतो”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

“काहींनी आक्रमक भूमिका घेतली आणि या ठिकाणी तोडफोडीची घटना घडली. त्या संदर्भात योग्य ती कारवाई होईल. आपला महाराष्ट्र नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आणि जातीय सलोखा ठेवणारा महाराष्ट्र आहे. जी घटना घडली त्या घटनेत काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये दोन वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत. मध्य प्रदेशात कोणत्यातरी एका घटनेची बातमी आणि त्यात एक फोटो टाकून स्टेटस ठेवल्यानंतर घटनेचा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. आता या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आलेलं आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

यवतमधील तणावावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

“मी एका कार्यक्रमात होतो. मात्र, तरीही आताच मी यवतच्या प्रकरणाबाबत माहिती घेतली. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. कोणत्यातरी पुजाऱ्याने बलात्कार केला वैगेरे अशा आशयाचं स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील करावा लागला. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

“सध्या दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसले आहेत. तणाव संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्या ठिकाणी तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना काहीजण घडवताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.