परभणी : एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आज येथे विकास कामांच्या संदर्भातील बैठकीकरता त्यांचे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर युवक काँग्रेस व किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी चुन्याच्या डब्या अजित पवार यांच्या वाहनावर या कार्यकर्त्यांनी फेकल्या. या सर्व कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परभणीतील विकास कामांच्या आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शनिवारी (दि.२६) जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर महापालिकेच्या प्रश्नावरील आढावा बैठकही ते घेणार आहेत. आज दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे पवारांच्या वाहनांचा ताफा जात असताना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव, किसान सभेचे पदाधिकारी शिवाजी कदम, प्रसाद गोरे आदींसह काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वक्तव्य केले होते. त्याचा जोरदार निषेध या कार्यकर्त्यांनी केला. हे सर्व कार्यकर्ते पवारांच्या ताफ्याच्या दिशेने झेपावत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडल्याने पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा देऊन त्यापासून पळ काढणाऱ्या अजित पवारांचा धिक्कार असो, ‘सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

परभणी जिल्ह्यातच माळसोन्ना या गावी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली. एकाच कुटुंबात या दोन आत्महत्या घडल्यानंतर या कुटुंबीयांना भेट द्यायला अजित पवारांना वेळ नाही पण आपल्या बगलबच्चांना टेंडर मिळवून देण्यासाठी ते परभणीत आले आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो अशी प्रतिक्रिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली. निवडणुकीच्या काळात सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते पण अजित पवारांनी स्वतःचीच सत्तर हजार कोटीची सिंचन घोटाळ्याची माफी करून घेतली या सरकारचे सगळ्यात मोठे लाभार्थी तेच आहेत असेही जाधव यावेळी म्हणाले. किसान सभेच्या प्रसाद गोरे यांनी अजित पवारांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडल्याचे सांगून मुठभर ठेकेदारांच्या भल्यासाठी ते परभणीत आले आहेत अशी प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister ajit pawar convoy stopped in parbhani css