शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा, असा निर्धार व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची मने जुळली असून राज्यात पुन्हा युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचे काय या गोंधळात न पडता भगव्याची सत्ता आणण्यासाठी सज्ज व्हा, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळताना सगळे कसे समसमान पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शिवसेनेची आकांक्षा फडणवीस यांच्यासमोर पुन्हा व्यक्त केली. त्यानंतर आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी देखील विरोधी पक्षालाही आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच पुन्हा विराजमान व्हावेत, असे वाटत असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची सर्वच स्तरातून स्तुती होत आहे. ते सर्वांच्या पाठिंब्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. इतकंच काय तर विरोधी पक्षांनाही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असल्याचे सांगत राम कदम यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला हाणला.

शिवसेनेने अनेकदा मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. तसेच आपल्या मुखपत्रातून आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. सगळेच कसे समसमान पाहिजे, असे विधान करत राज्यात पुन्हा युतीची सत्ता आल्यावर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद समान कालावधीसाठी हवे आहे, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा दिले होते. त्यानंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अभूतपूर्व यश मिळवण्यासाठी सज्ज व्हा. मुख्यमंत्री कोण याची चर्चा व्यर्थ आहे. आपण भगव्यासाठी लढणारे आहोत हे लक्षात ठेवा, असा संदेश दिला होता.