बिहार निवडणुकीत एनडीएला तुफान यश मिळालं आहे. २०० हून अधिक जागांवर एनडीएची आघाडी आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपाने जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बिहारच्या निकालांवर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

बिहारच्या जनतेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्यांनी मोदीजींच्या नेतृ्त्वावर विश्वास ठेवून आणि नितीश कुमार यांच्या विकासावर विश्वास ठेवून आमच्या घटकपक्षांसह एनडीएला प्रचंड मोठं बहुमत दिलं आहे. जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्यात २०१० चा रेकॉर्ड तुटू शकेल असा निकाल लागला आहे. मोदींवर बिहारचा विश्वास आहे ते दिसून येतं आहे. नितीश कुमार यांची स्वच्छ आणि प्रशासक अशी जी छबी आहे त्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे. चिराग पासवान, मांझी यांच्यासह आमची युती होती आम्हाला खूप चांगला प्रतिसाद बिहारच्या जनतेने दिला आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी विषारी प्रचार चालवला होता-देवेंद्र फडणवीस

दुसरी एक बाब अशी आहे की काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवला आहे त्याला जनतेने उत्तर दिलं आहे. संवैधानिक संस्थांचा अपमान करणं. जनमताला विरोध दर्शवणं, जनतेला हे कळलं आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो त्या मतांचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एकीकडे राजदची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसची अवस्था आणखी वाईट आहे. काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी निकाल तिकडे आला आहे. राहुल गांधींनी व्होट चोरीची यात्रा काढून पाहिली, नदीत उड्या मारुन पाहिल्या, डान्स करुन पाहिला पण लोकांचा विश्वास मोदींवर आणि नितीश कुमार यांच्यावरच आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे पक्ष आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येणार नाहीत. जातीचा मुद्दा आणि इतर सगळे मुद्दे मागे पडले आहेत. बिहारच्या जनतेसाठी विकास आणि सुशासन हाच मुद्दा प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी, नितीशजी हाच मुद्दा ठरला आहे. मी ज्या ठिकाणी प्रचार केला तिथेही लक्षात येत होतं की एनडीए खूप चांगल्या परिस्थितीत आहे. काही प्रमाणात अँटी इन्कंबन्सी मागच्या निवडणुकीच्या वेळी दिसली ती यावेळी अजिबातच दिसली नाही. प्रो इन्कंबन्सीचाच हा विजय आहे. १६० जागांच्या पुढे जाऊ असं आम्हाला वाटलं होतं. पण बिहारच्या जनतेने आम्हाला त्याही पेक्षा जास्त मतदान केलं आहे.

काँग्रेस आणि राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचं पतन होत राहिल-देवेंद्र फडणवीस

जोपर्यंत काँग्रेस आणि राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत त्यांचं पतनच होत राहिल. हे लोक कोर्टात गेले तिथे हरले. त्यानंतर निवडणूक आयोगाने कांग्रेसला चॅलेंज दिलं तुम्ही येऊन पुरावे घेऊन या. पण ते गेलेही नाहीत. कारण त्यांनाही माहीत आहे की आपण खोटं बोलत आहोत. लोकसभेच्या वेळीही त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला होता. तो फार काळ चालला नाही. लोकांना समजलं की तो फेक नरेटिव्ह होता. बिहारपेक्षा वाईट स्थिती त्यांची भविष्यात होत राहिल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबाबत आमचे वरिष्ठ नेते आणि मोदी निर्णय घेतील. बिहारमध्ये महिलांनी कायमच एनडीएला मतं दिली आहेत. फक्त महिलाच नाही युवांनीही मतदान भरभरुन दिलं आहे. मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे.