भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्याच पक्षातील नेते व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भाजपातील या नेत्यांमधील वादाची राज्यात जोरदार चर्चा झाली. आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी दोघांना आपल्या बाजूला बसवत त्यावर भाष्य केलं. ते शुक्रवारी (२६ मे) अहमदनगरमध्ये आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दोघांमध्ये वाद झाला म्हणूनच मी दोघांनाही एकत्र घेऊन बसलो. त्या दोघांमध्ये समन्वयच आहे. त्याची काहीही काळजी करू नका. दोघांमध्ये आता कोणताही वाद नाही. त्यांच्यात वाद असलं तरी वादळ नाही. त्यामुळे चिंता करू नका. तो चहाच्या पेल्यातील वाद आहे आणि तो संपला आहे.”

व्हिडीओ पाहा :

“नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे लोक”

नाना पटोलेंच्या दाव्यावर प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नाना पटोले, संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. माध्यमांना काम मिळावं म्हणून ते बोलतात. आम्हाला खूप कामं आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना उत्तरं देत नाही.” यावेळी फडणवीसांनी आमच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असंही नमूद केलं.

हेही वाचा : VIDEO: नव्या संसद उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरसले, इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले…

शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीत २२ जागांवर दावा, फडणवीस म्हणाले…

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असं खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, “आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment dispute between ram shinde radhakrishna vikhe patil in ahmednagar pbs