Devendra Fadnavis On First Term as CM: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या विकासाभिमुख निर्णयांचीही माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकांदरम्यान महायुतीला मिळालेला कौल सोबत मोठ्या प्रमाणावर जबाबदाऱ्याही घेऊन आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. तसेच, दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबाबत व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कोणताही बहुमताचा कौल जबाबदारी घेऊन येत असतो. आता ती जबाबदारी आमच्यावर आली आहे. काम करताना काही अडचणी येतात, मर्यादा असतात. त्यावर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजेत हा प्रयत्न आपल्याला करायचाय”, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता…

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा करायला सुरुवात केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. “गेल्या अडीच वर्षांत राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी संधी मिळाली, त्यातही अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली. ऊर्जा विभागात पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप आपण तयार केला आहे. आता लाडकी बहीण योजनेचाही डिसेंबरचा हप्ता आपण जमा करायला सुरुवात केली आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राला गतीने पुढे न्यायचा आमचा प्रयत्न आहे. परवा शिवराजसिंह चौहान आले होते. त्यांनी एकाच वर्षात आपल्याला २० लाख घरं पंतप्रधान आवास योजनेत मंजूर करून दिली आहेत”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

…तेव्हा लोकांना वाटायचं, हा कसं काम करेल – फडणवीस

“२०१४ साली जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. काहींना वाटायचं की हा मंत्रीही राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल? काहींना असं वाटायचं की अतिशय नवीन असं काम याच्याकडे आलंय. त्यामुळे याची कामगिरी कशी होईल? पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय होईल का? पण लोकांच्या लक्षात आलं की विदर्भासाठी आपण मोठं काम केलंच. पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर आपण अन्याय होऊ दिला नाही. विदर्भात सिंचनाचे ८० प्रकल्प आपण पूर्ण केले आहेत. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्, कोकण, मराठवाड्यातले प्रकल्पही आपण त्याच पद्धतीने पुढे आणले आहेत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

“माझ्या डोक्यात कधीच सत्ता जाणार नाही”

दरम्यान, सत्ता आली असली, तरी कधीच डोक्यात सत्ता जाणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. “पुन्हा एकदा जनतेनं, आमदारांनी, वरीष्ठ नेत्यांनी मला जी संधी दिली आहे, तिचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन. हे करताना पारदर्शी प्रामाणिक सरकार चाललं पाहिजे हा माझा आग्रह राहिला आहे. त्यावरच टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. राजकारणात सर्व पातळीवर जाऊन लोक आव्हान निर्माण करतात. पण कितीही मोठं आव्हान असेल, तरी धैर्याने त्या आव्हानाचा मी सामना करतो. कधीही सत्ता माझ्या डोक्यात जात नाही. मी राजकारणात ज्या विचारांनी आलो, त्यात सत्ता हे सेवेचं माध्यम असल्याचं शिकवलंय. त्यामुळे सत्ता माझ्या डोक्यात कधीही जाणार नाही याची मी खात्री देतो”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis first term as maharashtra cm in 2014 at nagpur press conference pmw