Premium

“देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणाविषयीचा हेतू प्रामाणिक होता, पण…”, विचारवंत सदानंद मोरेंनी काय म्हटलं?

ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक सदानंद मोरे यांनी नेमकी काय भूमिका मांडली?

What Sadanand More Said?
सदानंद मोरे यांनी काय भूमिका मांडली? (फोटो-ग्राफिक्स टीम, लोकसत्ता )

२०१८ ला देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण मराठा समाजाला दिलं ती शुद्ध फसवणूक होती असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला आहे. तसंच २०१४ मध्ये मी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात टिकू दिलं नाही उलट जाऊ दिलं असाही आरोप चव्हाण यांनी केला. मराठा आरक्षणाचा हा मुद्दा चर्चेत आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी गावात सुरु केलेलं उपोषण. महाराष्ट्राचे विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे याचं स्पष्ट मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे पण वाचा- मराठा आरक्षण दिल्यास ओबीसींचं आरक्षण कमी होणार? फडणवीस म्हणाले, “दोन समाज…”

सदानंद मोरे यांनी काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत?

“देवेंद्र फडणवीस हे माझ्या घरी आले होते. महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी जातीने लक्ष घातलं होतं. माझ्याकडे आल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही मदत करा. मी त्यांना जी शक्य होती ती सगळी मदत केली, म्हणजेच इतिहास सांगणं, मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणं या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. देवेंद्र फडणवीस यांना मी जी आवश्यक आहेत ती कागदपत्रंही दिली. त्यांनी गायकवाड समिती नेमली होती. त्यांना कागदपत्रं देणं, साक्ष द्यायची असते ती देणं. त्या काळात म्हणजेच फडणवीस मुख्यमंत्री असताना ते प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून होते.” असं सदानंद मोरेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होते

“अहमदनगरच्या संभाजीराव भुसे पाटील यांची सुरुवातीला समितीवर नियुक्ती झाली होती. मात्र त्यांचं अचानक निधन झालं. त्यानंतर गायकवाड समिती नेमली गेली. या सगळ्या प्रक्रियेत मी देवेंद्र फडणवीसांसह काम करत होतो. त्यावेळी आमचा चांगला संवाद होता. मला कुणाचीही स्तुती करायची नाही. मी वस्तुस्थिती सांगतो, एखादी गोष्टी मला जाणवली, काही बदल सुचवायचे असतील तर मी संध्याकाळी पाच वाजता त्यांना मेसेज करायचो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. पाच वाजता त्यांच्याकडे गर्दी असणार, इतर कामं असणार सगळं साहजिक आहे. रात्री ११ पर्यंत वाट पाहून मी झोपलो. सकाळी उठलो, What’s App पाहिलं. पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला रिप्लाय केला होता. त्यांनी मनापासून केलं. त्यावेळी लोक संशय घेत होते, माझ्याकडे जेव्हा फडणवीस आले तेव्हा मला त्यांचा मराठा आरक्षणाविषयीचा हेतू प्रामाणिक होता हे जाणवलं. त्यामुळे मी सर्वतोपरी मदत केली. मी देवेंद्र फडणवीस यांना मदत करू नये असंही सांगणारे काही लोक होते, मी म्हटलं मी मराठ्यांसाठी करतो आहे. मी फडणवीस या व्यक्तीशी किंवा भाजपासाठी मी हे करत नाही. त्यांना एक चांगली गोष्ट करायची आहे, तसंच मराठा समाज ही खरोखर मागासलेली आहे आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे ज्याला अभ्यासाच्या जोरावर माहित आहे असा मी होतो. त्यामुळे मी माझ्या परिने पूर्ण मदत केली. मी त्यावेळी पक्ष पाहिला नाही, तसंच मी जातही पाहिला नाही. मी चार शिव्याही खाल्ल्या. आत्ताही फडणवीसांची स्तुती केल्याबद्दल कदाचित लोक मला शिव्या देतील पण मी जे खरं आहे ते सांगितलं” असंही सदानंद मोरेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांवर दोन गंभीर आरोप,”२०१८ चं मराठा आरक्षण ही निव्वळ फसवणूक आणि..”

सारथी ही संस्था सर्वात चांगली

मराठा समाजातल्या मुलांना आपण सकारात्मक पद्धतीने मदत केली पाहिजे. त्यांच्या मदतीसाठी आपण एक संस्था काढली पाहिजे अशी माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. ते मला म्हणाले आपण अशी संस्था नक्की सुरू करू त्यासंबंधीचा एक अहवाल तयार करून द्या. तुम्ही त्याचे अध्यक्ष व्हा असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही संस्था उभारली ती अवघ्या वर्षभरात. इतक्या कमी वेळात इतकी चांगली संस्था भारतात आत्तापर्यंत कुठल्याही संस्थेने उभारलं नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर मी तातडीने राजीनामा दिला कारण दुसरं सरकार आल्याने मी त्या संस्थेच्या अध्यक्षपदी कसा राहणार? तो उद्धव ठाकरेंनी मान्य केला. त्यानंतर माझा मराठा आरक्षण आणि सारथी संस्थेचा संबंध संपला. असं सदानंद मोरे यांनी थिंक Bank या कार्यक्रमात सांगितलं आहे. विनायक पाचलग यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट मत मांडलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis intentions on maratha reservation were sincere but what did thinker and writer sadanand more say scj

First published on: 11-09-2023 at 14:25 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा