उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२४ ऑगस्ट) जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो ३ प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा जपान दौर्‍याचा चौथा दिवस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जपानचे उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा म्हणाले, जपान जी-७ चे नेतृत्व करत असून भारत जी-२० चे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे हे दोन देश जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावू शकतात. जपान सरकार सातत्याने नवीन संशोधनाला चालना देत असून एमएसएमईला सहकार्य करीत आहे. वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे उद्योगांचे पॉवरहाऊस आहे. सुमारे ७५० जपानी कंपन्या महाराष्ट्रात आहेत. आता महाराष्ट्रात सिंगल विंडो परवानगीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम अतिशय वेगाने सुरू आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या उदघाटनासाठी आपण सुद्धा यावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. मेट्रो-३ चे सर्व प्रलंबित विषय आता मार्गी लागले असून त्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प अतिशय महत्वपूर्ण असून शिवाय पोर्ट कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यावर राज्य सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

मित्सुबिशीचे उपाध्यक्ष हिसाहिरो निशिमोटो यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तळेगाव येथे मित्सुबिशीने गुंतवणूक केली असून पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याचा महाराष्ट्राचा मनोदय असून मित्सुबिशीसुद्धा या क्षेत्रात काम करीत आहे. महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्यास मित्सुबिशीने अनुकूलता दर्शवली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात पुण्यात आणखी गुंतवणूक करणार असल्याचे मित्सुबिशीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

नागपुरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर सुरू होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एनटीटी डेटाचे उपाध्यक्ष हिदेएकी ओझाकी यांची भेट घेतली. पुण्यात एनटीटीचे डेटा सेंटर आहे. राज्यात डेटा सेंटर धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. एनटीटीने मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त अन्य जागांची सुद्धा चाचपणी करावी. नागपूर हे मध्य भारतातील महत्वाचे ठिकाण ठरू शकते. आयआयएमच्या मदतीने नागपुरात आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर सुरू करत आहोत, त्यामुळे एनटीटी त्यात सहकार्य करू शकते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा >> “…म्हणून आम्ही दक्षिण ध्रुव निवडला”, इस्रो प्रमुखांनी सांगितलं Chandrayaan 3 मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट

मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी मागितले जायकाचे सहकार्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जायकाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाकाझावा केईचिरो यांची भेट घेतली. मेट्रो-३, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन इत्यादी प्रकल्पांना वित्तपुरवठा केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. नागनदी आणि मुळा-मुठा नदी संवर्धन सुद्धा सुरू झाले आहे. या सर्व प्रकल्पांवर ‘वॉर रूम’च्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. या सर्व प्रकल्पांबाबत जशी सहकार्याची भूमिका जायकाने घेतली, तशीच भूमिका वर्सोवा-विरार सी लिंकसाठी घ्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पात सुद्धा मदत करण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईची यशोगाथा सांगितली जाईल, तेव्हा जपानचे सुद्धा स्मरण केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्प हा मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis japan tour big investment in maharashtra asc