Devendra Fadnavis : शतकापूर्वी रंगभूमीवर आलेले आणि रसिकमनांत विराजमान झालेले ‘संगीत मानापमान’ हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक आणि त्यातील गाजलेली नाट्यपदं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. याच अभिजात नाटकावरून प्रेरित असलेल्या ‘संगीत मानापमान’ या चित्रपटातही १८ प्रतिभावंत गायकांनी गायलेल्या १४ गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च करण्यात आला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय टोलेबाजीही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी गेल्या दोन दिवसांत मंत्री मंडळाचा विस्तार, खातेवाटप, बंगले वाटप, दालन वाटप करून संगीत मानापमानला आलो आहे. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिश्किलीत म्हणाले. “या क्षणाचा मी साक्षी होऊ शकतोय याचा मला आनंद आहे. ११३ वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकात आहे ते नाटक आज रुपेरी पडद्यावर नवीन स्वरुपात पाहायला मिळतंय. सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, भामिनीही साकारली आता धैर्यधरही होणार. आम्हाला तसं मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, पण पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“११३ वर्षांच्या या संगीत मानपानाबाबत अनेक दंतकथा आहेत. सोन्याचा भावापेक्षा जास्त दरात या नाटकाची तिकिटे विकली गेली. स्वातंत्र्याच्या लढ्यात टिळक स्वराज्य ट्रस्टकरता याच संगीत मानापमानाचे प्रयोग करण्यात आले. ही संगीत नाटकांची परंपरा, खऱ्या अर्थाने मराठी भाषेला लाभली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली. आपलं नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. या परंपरा नव्या स्वरुपात नव्या पिढीसमोर येणं महत्त्वाचं आहे. कदाचित ६७ पदं ऐकण्याचं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. याचं सौंदर्य या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यातून नव्या पिढीत उत्कंठा निर्माण होऊन थिएटरमध्ये जाऊन मानापमान पाहावं. ट्रेलर इतका सुंदर आहे की चित्रपटही सुंदरच असेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on sangeet manapaman movie trailer launched sgk