Devendra Fadnavis : कर्नाटक सरकारने शिवाजी नगर हे मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाचे पहिले पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या राजकीय कारकिर्दीवरुन टीका होत असते. नेहरुंच्या भूमिकेवरुन त्यांच्याकडून काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत पंडित नेहरुंच्या इतिहासाची आठवण करुन दिली. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणे याचा मी निषेध करतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय टीका केली?

शिवाजी नगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो. एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून केलं जातं आहे याचं मला दुःख आहे. पण मला याचं नवल वाटत नाही. कारण छत्रपती शिवरायांना अपमानित करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असल्यापासून आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं होतं त्यात त्यांनी ज्या प्रकारे मत व्यक्त केलं होतं ते आपल्याला माहीत आहे. महाराजांना अपमानित करण्याची ती परंपरा आता आपल्या काँग्रेसच्या सरकारांमध्ये दिसते आहे. याचा आम्ही निषेध करतो. मी तर ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. ज्यांच्यामुळे आपल्या देशाने स्वराज्य पाहिलं त्यांचं नाव बदलून काहीतरी धार्मिक तेढ निर्माण होईल अशी बाब ते करणार नाहीत देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधकांबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अलिकडच्या काळामध्ये जो काही विरोधी पक्ष आहे त्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे की आता ते विधानसभेतले किंवा लोकसभेतले विरोधी पक्ष राहिले नाहीत. तर कधी समाजविरोधी, व्यक्ती विरोधी अशा भूमिका घेताना दिसतात. विरोधी पक्षाने धोरणांचा, योजनांचा विरोध करावा. पण समाजाचा आणि व्यक्तींचा विरोध करणं योग्य नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जीआर बाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मराठा आरक्षण व हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात ओबीसी नेत्यांकडून याचिका करण्यात आली आहे. त्यावर, बोलताना फडणवीस म्हणाले की, याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन जीआर काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा जीआर देत नाही. पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच हा जीआर मदत करतो. मी ओबीसी समाजातील नेत्यांना सांगू इच्छितो कोणालाही सरसकट आरक्षण दिलेलं नाही, पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले