‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं याचिकेत शिवसेनेने म्हटलं आहे. याप्रकरणावती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यांनी म्हटलं, “निवडणूक आयोगाने शिवसेनेला पाहिजे तेवढी वेळ दिली. पण, वेळ काढून कायदा टाळता येत नाही, कधीतरी त्याला सामोर जावं लागतं. आयोगाने अंतरिम निर्णय दिला आहे, अंतिम नाही. त्यामुळे एखादे प्रकरण कमजोर असते तेव्हा स्वायत्त संस्थावर हल्ला करायचा ही शिवसेना, काँग्रेसची पद्धत आहे. आपल्या बाजूनं निकाल दिला तर उत्तम अन्यथा संस्थाविरोधात बोलायचं,” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर हल्ला केला आहे.
हेही वाचा – बाळासाहेब आणि त्रिशूळ… दोघांचीही एकच मागणी; शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमने-सामने
दरम्यान, शिवसेनेने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यावर उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर सोमवारी शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गट ठाकरेंची कोंडी करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचं दिसत आहे.