शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. भाजपावर निशाणा साधत उद्धव म्हणाले की, आम्हीच त्यांना २५ वर्षे जोपासले आणि हे दुर्दैव आहे. त्यांच्यासोबत आमची २५ वर्षे वाया गेली. भाजपाची आणीबाणी मोडून काढायची तर दिल्लीत शिवसेनेसारखा पक्ष हवा. त्यासाठी इतर राज्यांतही शिवसेना वाढवण्यासह महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या जिद्दीनेच लढूया, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला.

‘‘वापरा आणि फेकून द्या हे भाजपचे धोरण आहे. ममता, जयललिता, शिवसेना, अकाली दल यांच्याशी युती करून त्यांनी एकेकाळी सत्ता मिळवली. नंतर सर्वाना बाजूला सारले. आता एनडीएत यापैकी कोणीही उरलेले नाही. भाजपचे नवहिंदूुत्ववादी हिंदूुत्वाचा वापर केवळ स्वार्थासाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदूुत्व आमचे नाही. सत्तेसाठी संघमुक्त भारत म्हणणारे नितीशकुमार, काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांच्याशी युती हे भाजपचे राजकारण. काश्मीर ते कन्याकुमारी एक धोरण ठेवून दाखवा’’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“लढ्यात आपला एकमेव पक्ष आहे. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा. बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले नवहिंदू सगळे भंपक नव्या पिढीला हे माहिती व्हावे म्हणून पुनरूच्चार करत आहे. आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो. मोदींचा, शाहांचा अर्ज भरण्यास गेलो.  मनापासून तुमचा प्रचार केला. भाजपा पंतप्रधानांचा चेहरा लावून जिंकल्याचे म्हणत असाल तर तुम्ही माझाही, शिवसेनेचाही वापर करुन तुम्ही निवडणुका जिंकत असाल असे मी म्हणू शकतो. मला आग्रह करुन निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी बोलवले होते. आज एनडीए राहिली नाही जुने ते सर्व गेले,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

“डोळ्यासमोर आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना दिसतो तेव्हा..”; उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

यावरुन आता राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. “माझा चेहरा वापरला असे महादेव जानकर आणि विनायक मेटेसुद्धा म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही चेहरा वापरला होता. त्यावेळी सगळे युतीमध्ये होते म्हणून सगळ्याचेच फोटो वापरले होते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“तुमचे हिंदुत्व कागदावरचे आहे. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावे लागते. नरेंद्र मोदींनी राम मंदिर, काशी विश्वनाथ, ३७० असे निर्णय घेतले. ३७० वर तुमची तर संदिग्ध भूमिका होती. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले, त्यापैकी १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. १९९६ साली २४ पैकी २३ जागी आणि २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता?,” असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.