देशात सत्तांतर घडवून आणण्याच्या निर्धाराने वाटचाल करू लागलेल्या शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या या महायुतीच्या प्रचाराचा बिगुल आज पश्चिम महाष्ट्रातून वाजला असून हा काँग्रेसला निस्तनाभूत करण्याचा हा शुभारंभ असल्याचे म्हणत महायुतीच्या पहिल्या सभेत शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या माध्यमातून लोकसभा जिंकणार असल्याचा विश्वास जनतेसमोर व्यक्त केला.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत आणि मुख्यमंत्री परदेशात जाऊन त्यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण देतात. काँग्रेस सरकारचा महाराष्ट्रात चाललेला हा मुर्खपणा आता जनता सहन करणार नाही. जे शहाणे झाले ते महायुतीत आले आता महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रवादीने तर, प्रत्येकवेळी फोडोफोडीचे राजकारण केले. महाभारतात शरद पवार असते, तर त्यांनी तिथेही फोडा-फोडी केली असती मुस्लिमांवर अन्याय झाला आणि ते दहशतवादी झाले, तर याला कोण जबाबदार? असे शरद पवार म्हणतात. मग, शेतकऱयांवर अन्याय झाला आणि शेतकरी दहशतवादी झाले याची जबाबदारी कोणाची? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
शेतकऱयांवर कोणी घाला आणत असेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल, तर शिवसेना गप्प बसणार नाही. शेतकऱयांवर होणाऱया अन्यायामुळेच आज या महासभेला इतकी गर्दी झाली आहे. सभेला आलेली जनता घरून ठरवूनच आली आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसच्या सभेला पैसे देऊन माणसे आणली जातात महायुतीच्या सभेला जिवंत वाघ आले आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत माझ्या विरुद्ध अजित पवारांना उभे करावे बारामतीचे पार्सल बारामतील पाठवून देतो असे म्हणत भाजप नेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रवादीला आव्हान केले.
तसेच महायुतीच्या सभेत राजू शेट्टींनी दिलेल्या आसूडाने सत्ताधा-यांना महाराष्ट्र आणि दिल्लीतून फटके मारून हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही असेही गोपीनाथ मुंडे म्हणाले.
तसेच इचलकरंजीत झालेल्या या महायुतीच्या महासभेतूनच मी सांगू इच्छितो की, निवडणुकीत राजू शेट्टी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येतील. असेही गोपीनाथ मुंडे म्हणाले.
राज्यातील साखर कारखाने राष्ट्रवादीने स्वत:च्या तिजोरी भरण्याकरता काढले आहेत. सामान्य मराठी माणसाला आज साखर कारखाना काढता येत नाही. महायुती सत्ता येऊ द्या शरद पवारांच्या समक्ष महाराष्ट्रात साखर कारखान्यांची संख्या वाढविल्याशिवाय राहणार नाही. असेही गोपीनाथ मुंडे म्हणाले.
पवारांना लक्ष्य करत मुंडे पुढे म्हणाले की, शरद पवार चतुर राजकारणी आहेत. त्यांना भविष्यात काय होणार आहे हे माहिती होते. त्यामुळे त्यांनी राज्यसभेचा अर्ज भरला कारण, त्यांना माहित आहे की आजा निवडणुकीला उभे राहीलो, तर तोंडावर पडू.
महायुतीच्या प्रचाराचा बिगुल इचलकरंजीतील महासभेमध्ये गुरुवारी संध्याकाळी वाजला. यावेळी आघाडी सरकारवर चौफेर टीका करत आता महाराष्ट्रातील ‘लालूं’ना कारागृहात पाठविण्याची वेळ आल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला आघाडी सरकारने घोटाळयांशिवाय दुसरे काही दिलेच नाही. सिंचन घोटाळ्याचे सर्वच्या सर्व पैसे अजित पवारांच्या तिजोरीत गेले. त्यामुळे आता फक्त जनतेने ठरवायचे आहे, घोटाळेबाज आघाडी सरकारसोबत जायचे की महायुतीच्या जिगरबाजांसोबत.
काँग्रेस सरकार फक्त गरिबांच्या नावाने योजना सुरू करते पण त्याचे सर्व फायदे त्यांच्या नेत्यांनाच होतात. गरिबांपर्यंत कोणतीच योजना पोहोचत नाही, असे म्हणत काँग्रेसच्या योजनांवर फडणवीसांनी टीका केली. विजेच्या दरावर ते म्हणाले, निवडणुका जवळ आल्याने राज्यात वीजदर कमी झाले. याचा अर्थ वीजदर कमी होऊ शकतात हे सरकारला माहिती होते. महायुतीचे सरकार येऊ दे, आम्ही पहिल्यांदा वीज खात्यातील भ्रष्टाचार नष्ट करू म्हणजे, वीजदर आणखी कमी होतील.