Uddhav Thackeray : धनंजय मुंडे यांनी मंगळवारी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड आहे हे देखील समोर आलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र मागचे तीन महिने राजीनामा झाला नव्हता. ४ मार्चच्या सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला जो स्वीकारला गेला आहे. मात्र विरोधकांना या राजीनाम्याचं श्रेय मिळू नये म्हणून सरकारने औरंगजेबाचा वापर केला अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

धनंजय मुंडेंनी राजीनाम दिला आहे. हे एक नाटक आहे. मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांना मुंडे यांनी पोसलेल्या गुंडांनी अत्यंत क्रूरपणे म्हणजेच औरंगजेबी पद्धतीने मारले. या खुनाची नैतिक जबाबदारी घेऊन मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. खरंतर मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी होती, पण मुंडे यांचे जे राजीनामापत्र प्रसिद्ध झाले आहे त्यानुसार महाशयांनी देशमुख खून प्रकरण नव्हे तर वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला. मुंडे यांच्या राजीनामापत्रातील भाषा म्हणजे नैतिकता या शब्दाची क्रूर थट्टा आहे. माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरुन मी मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस मला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे वगैरे म्हटलं आहे. मुंडे यांनी दिलेला राजीनामा ही धुळफेक आणि अॅडजेस्टमेंट आहे. मुंडे यांनी सांगितलं की त्यांना बेल्स पाल्सी नावाचा गंभीर आजार झाला आहे त्यामुळे त्यांना दोन मिनिटंही नीट बोलता येत नाही. राजीनाम्यानंतर दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ते चांगलेच चुरुचुरु बोलत आहेत, त्यामुळे विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

अबू आझमी भाजपाचे ब्रँड अॅम्बेसेडर

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून भाजपाने क्रूर औरंग्याचा वापर केला. त्याचसाठी भाजपाच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी देण्यात आली. भाजपा-शिंदेंच्या सूचनेनुसार आझमींनी औरंग्या किती चांगला प्रशासक होता हे विधीमंडळाच्या आवारात सांगितलं. आझमी यांनी औरंग्यावर वक्तव्य करताच भाजपाने गोंधळ सुरु केला. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाने आवाज उठवताच सत्ताधारी बाकांवर आझमींच्या औरंगजेबावरील विधानावरुन घमासान सुरु झाले. त्या गोंधळात विधानसभा संपली. राष्ट्रीय पातळीवर ओवैसी आणि राज्यात आझमींसारखे लोक हे भाजपाचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत. भाजपाच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटला आहे. भाजपाचे एकलव्य म्हणून आझमी यांनी मोठेच काम केले. आझमी यांनी गायलेलं औरंगजेब स्तवन सरळ सरळ सरकार पुरस्कृत होते. लोकांना मूर्ख समजलात का? असाही सवाल सामनाच्या अग्रलेखातून कऱण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananajay munde resignation shivsena ubt criticized devendra fadnavis government said this is not enough scj